दुसऱ्याच बाटल्या पोलिसांना देण्याचा प्रयत्न : शेतकऱ्याचा कृषी अधिकाऱ्यांच्या गाडीसमोर ठिय्या
ग्रेप मास्टर या संजीवकाच्या वापरामुळे खुजगाव येथील रवींद्र देशमुख या शेतकऱ्याच्या द्राक्ष बागेचे नुकसान झाले. याबाबत देशमुख यांनी कृषी विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारीनंतर तत्कालीन कृषी अधिकारी सर्जेराव अमृतसागर यांनी 'ग्रेप मास्टर'च्या बाटल्या पंचनामा करून जप्त केल्या होत्या. याप्रकरणी संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र अमृतसागर यांच्याकडून जप्त केलेल्या बाटल्या गहाळ झाल्याचे बोलले जात आहे. त्यांनी दुसऱ्याच बाटल्या पोलिसांना देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला देशमुख यांनी अटकाव केला. ज्या बाटल्यांचा पंचनामा झाला आहे, त्याच बाटल्या पोलिसांना द्या, अशी मागणी करत देशमुख यांनी चक्क कृषी अधिकाऱ्यांच्या शासकीय गाडीसमोर ठिय्या मांडला.
रवींद्र देशमुख यांनी ग्रेप मास्टर हे संजीवक आपल्या द्राक्ष बागेमध्ये वापरले होते. या संजीवकाच्या वापरामुळे देशमुख यांच्या द्राक्ष बागेचे नुकसान झाले. याबाबत देशमुख यांनी कृषी विभागासह विविध ठिकाणी तक्रारी केल्या. त्यावेळी तासगावचे तत्कालीन तालुका कृषी अधिकारी सर्जेराव अमृतसागर यांनी द्राक्ष बागेची पाहणी केली. देशमुख यांच्याकडून ग्रेप मास्टरच्या मोकळ्या बाटल्या पंचनामा करून जमा केल्या.
याबाबत गेल्या वर्षभरापासून देशमुख यांच्याकडून संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल करावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र गेल्या वर्षभरापासून कृषी विभाग व तासगाव पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यासाठी टाळाटाळ होत आहे. या संदर्भात पोलिसांनी कायदे तज्ञांकडून मार्गदर्शन घेतले. त्यानंतर संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल करण्यासाठी सहमती दर्शवली. विद्यमान कृषी अधिकारी अनिल फोंडे यांना पत्र देऊन गुन्हा दाखल करण्यासाठी कोणालातरी प्राधिकृत करावे, अशी मागणी केली.
यानंतर कृषी अधिकारी अनिल फोंडे यांनी तत्कालीन कृषी अधिकारी सर्जेराव अमृतसागर यांना पत्र काढून जप्त केलेल्या ग्रेप मास्टरच्या बाटल्या कृषी विभागाकडे जमा कराव्यात, असे सांगितले. मात्र अमृतसागर यांनी त्या बाटल्या कृषी विभागाकडे जमा केल्या नाहीत. दरम्यान, पीडित शेतकरी रवींद्र देशमुख यांनी 26 जानेवारी रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे फोंडे यांनी अमृतसागर यांना पुन्हा दुसरे पत्र काढून बाटल्यांची मागणी केली.
त्यानंतर सोमवारी अमृतसागर यांनी काही बाटल्या कृषी विभागाच्या ताब्यात दिल्या. या बाटल्या तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या गाडीत होत्या. मात्र गाडीतील बाटल्या या पंचनामा केलेल्या नसून त्या दुसऱ्याच कुठल्यातरी आहेत, अशी शंका देशमुख यांना आली. त्यानंतर देशमुख यांनी या बाटल्या मला बघायचे आहेत, अशी विनंती तालुका कृषी अधिकारी अनिल फोंडे यांना केली. मात्र दुपारी अडीच वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत फोंडे यांनी त्यांना या बाटल्या देशमुख यांना दाखवल्या नाहीत.
पंचनामा केलेल्या बाटलीवर कोणत्याही प्रकारचे लेबल अथवा स्टिकर नव्हते. मात्र ज्या बाटल्या पोलिसांकडे देण्याचा प्रयत्न होत आहे, त्यावरती लेबल आणि स्टिकर आहे, असे म्हणत देशमुख यांनी अमृतसागर यांच्याकडून दुसऱ्याच बाटल्या पोलिसांना देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. दरम्यान, रात्री आठ वाजेपर्यंत या बाटल्या पाहण्यास दिल्या नसल्यामुळे देशमुख यांनी चक्क अनिल फोंडे यांच्या शासकीय गाडीसमोर ठिय्या मांडला. त्यानंतर कृषी विभागाचे सर्व अधिकारी शासकीय गाडी तहसील कार्यालयाच्या आवारातच सोडून अक्षरशः पळून गेले.
त्यानंतर तहसीलदार अतुल पाटोळे यांनी कृषी अधिकारी अनिल फोंडे यांना फोन करून हा तुमच्या विभागाशी निगडित विषय आहे. तुम्ही तात्काळ तुमच्या गाडीजवळ या. रवींद्र देशमुख यांची जी काही तक्रार आहे त्याचे निरसन करा, असे फोंडे यांना सुनावले. त्यानंतर फोंडे यांच्यासह कृषी विभागाचे काही कर्मचारी शासकीय गाडीजवळ आले. त्यानंतर सर्वजण पोलीस ठाण्यात आले. यावेळी अमृतसागर यांनी दिलेल्या त्या बाटल्या पोलीस ठाण्यात जमा करण्याचा प्रयत्न कृषी अधिकाऱ्यांकडून झाला.
मात्र त्याला देशमुख यांनी अटकाव केला. पंचनामा केलेल्या या बाटल्या नाहीत. तुम्ही दुसऱ्याच कुठल्यातरी बाटल्या देत आहात, असा आरोप केला. त्यानंतर पोलिसांनी कृषी अधिकारी व तक्रारदार देशमुख यांना दुसऱ्या दिवशी येण्यास सांगितले. काल मंगळवारी पुन्हा कृषी विभागाचे काही लोक पोलीस ठाण्यात आले. मात्र ज्या बाटल्या सोमवारी देण्याचा प्रयत्न झाला त्या बाटल्या त्यांनी मंगळवारी पोलीस ठाण्यात दिल्याच नाहीत. तर पोलिसांनीही याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल करून घेतला नाही. गेल्या वर्षभरापासून हा सगळा खेळ सुरू आहे.
ग्रेप मास्टरच्या उत्पादकाला वाचवण्यासाठी नेमका कोण प्रयत्न करत आहे, याबाबत गौडबंगाल आहे. देशमुख हे गेल्या वर्षभरापासून याबाबत पाठपुरावा करत आहेत. मात्र शेतकऱ्यांची बांधिलकी असणारा कृषी विभाग शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहत नसल्याचे चित्र आहे. याप्रकरणी आता देशमुख यांनी 26 जानेवारी रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.