दोन पोळ्या खाऊन तासाभरात येतो | गॅस गळतीनंतर लागलेल्या आगीचे गांभीर्यच नाही?

0
340

तासगाव : (अमोल पाटील)

येथील महिला तंत्रनिकेतनमधील स्वयंपाकगृहात गॅसची पाईप लिकेज झाल्याने आगीचा भडका उडाला. यावेळी डायनिंग हॉलमध्ये जेवण करणाऱ्या विद्यार्थिनी भयभीत झाल्या. अनेकांचा रक्तदाब कमी – जास्त झाला. एकाच वेळी डायनिंग हॉलमधून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात काही विद्यार्थिनी जखमी झाल्या. हा गंभीर प्रकार घडल्यानंतरही महिला तंत्रनिकेतनचे प्रभारी प्राचार्य संदीप पाटील यांना स्वतःच्या पोटाची चिंता होती. दोन पोळ्या खातो, आणि तासाभरात महाविद्यालयावर येतो, असे निर्दयीपणाचे उत्तर त्यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना दिले. त्यामुळे गॅस लिकेज होऊन आगीसारखी गंभीर घटना घडल्यानंतरही प्राचार्यांना याचे गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे.

       

तासगाव – मनेराजुरी रस्त्यालगत शासकीय महिला तंत्रनिकेतन महाविद्यालय आहे. या महाविद्यालयात विविध ठिकाणाहून सुमारे 1200 विद्यार्थिनी शिक्षण घेतात  मंगळवारी रात्री या महाविद्यालयाच्या किचनमधील गॅसची पाईप लिकेज झाली. त्यामुळे आगीचा भडका उडाला. किचनमध्ये गॅस सिलेंडरचा भडका उडाल्याची माहिती मिळताच डायनिंग हॉलमध्ये जेवण करणाऱ्या विद्यार्थिनी भयभीत झाल्या. गॅसचा स्फोट झाला, या समजूतीने या विद्यार्थिनी सैरावैरा पळू लागल्या.

         

या घटनेमुळे अनेक विद्यार्थिनींचा रक्तदाब कमी – जास्त झाला. सर्व विद्यार्थिनी एकाच वेळी दरवाज्यातून जीवाच्या आकांताने बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत होत्या. त्यामुळे सात ते आठ विद्यार्थिनींना किरकोळ जखम झाली. या प्रकारामुळे महाविद्यालयातील विद्यार्थिनी प्रचंड घाबरून गेल्या. गॅसच्या गळतीमुळे अनेकांना श्वसनाचा त्रास होऊ लागला. बऱ्याच विद्यार्थिनींना श्वास घेताना अडचणी येऊ लागल्या.

       

त्यामुळे या सर्व विद्यार्थिनींना तासगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यातील काही विद्यार्थिनींना रात्री उशिरा एका खाजगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले. ही घटना समजतात तहसीलदार अतुल पाटोळे व पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. तर आमदार रोहित पाटील यांनीही दवाखान्यात भेट देऊन विद्यार्थिनींच्या तब्येतीची विचारपूस केली. त्यांच्या उपचाराबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. माजी खासदार संजय पाटील यांनीही संबंधितांशी फोनवरून चर्चा करून विद्यार्थ्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या.

       

दरम्यान घटना घडल्यानंतर तास ते दीड तास हा सगळा गोंधळ सुरू होता. मात्र महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य संदीप पाटील हे आपल्या सांगली येथील घरी अगदी आरामात बसले होते. त्यांचे फोनवरूनच माहिती घेण्याचे काम सुरू होते. दरम्यान प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना फोन करून घडलेल्या घटनेची माहिती घेतली. यावेळी त्यांना तासगावात येण्यास किती वेळ लागेल, अशी विचारणा करण्यात आली. यावर त्यांनी मला यायला तासभर लागेल. आल्यानंतर त्या ठिकाणी रात्री किती वाजेपर्यंत थांबावे लागेल, हे माहीत नाही. त्यामुळे थोडसं जेवण करून, दोन पोळ्या खाऊन येतो, असं धडधडीत निर्दयीपणाचे उत्तर त्यांनी दिले.

         

एकीकडे या वसतीगृहात गेल्या वर्षभरापासून अधीक्षक नसल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. याशिवाय या महाविद्यालयात अनेक अडचणी आहेत. त्याकडे कोणीही लोकप्रतिनिधी लक्ष द्यायला तयार नाही. अशा स्थितीत महाविद्यालयात गॅस पाईपच्या लिकेजमुळे भडका उडून अनेक विद्यार्थ्यांनी भयभीत झाल्या. काही विद्यार्थिनींवर उपचार सुरू आहेत. असे असतानाही प्रभारी प्राचार्य संदीप पाटील यांना मात्र स्वतःच्या पोटाची चिंता होती. तासगावला आलो तर रात्री परत कधी जाणार. कधी जेवण मिळणार, ही चिंता त्यांना सतावत होती. 

     

त्यांना मुलींच्या सुरक्षेपेक्षा स्वतःचे जेवण महत्त्वाचे वाटत होते. एखादा दिवस जेवण पुढे – मागे झाले अथवा अगदी मिळालेच नाही तरी फार मोठा झोळीत धोंडा पडणार नव्हता. मात्र तरीही निर्दयीपणाचा कळस गाठणाऱ्या पाटील यांनी जेवण केल्याशिवाय तासगावला येणार नाही, असे खणखणीतपणे सांगून टाकले. अखेर दीड तासानंतर ते तासगावात आले. त्यांच्या या निर्दयीपणाबद्दल विद्यार्थिनी आणि पालकांमधून संताप व्यक्त होत आहे.

         

विद्यार्थिनी अडचणीत असताना संदीप पाटील या महाशयांना स्वतःचे जेवण प्रिय होते. वास्तविक त्यांनी घटना घडल्याचे समजताच क्षणाचाही विलंब न लावता महाविद्यालयात धाव घेणे गरजेचे होते. विद्यार्थिनींना आधार देण्याची गरज होती. मात्र त्यांच्या या निर्दयीपणाच्या वागणुकीबद्दल विद्यार्थिनी व पालकांमधून प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here