मोठ्या संख्येने उपस्थित रहा : सुभाष पाटील
जत : जत तालुक्याचे ज्येष्ठ नेते, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा शिक्षण महर्षी स्वर्गीय बसवराज काका पाटील यांच्या संख येथील सुशोभीत पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण शुक्रवार आज दि.२४ जानेवारी रोजी सकाळी साडे दहा वाजता देशाचे नेते व माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्याहस्ते व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंतराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होत असल्याची माहीती संखचे सरपंच सुभाष बसवराज पाटील व पुतळा संयोजन समितीच्या वतीने आयोजित पत्रकार बैठकीत देण्यात आली.
लोकनेते स्वर्गीय राजारामबापू पाटील यांच्या विचारांनी व त्यांच्या नेतृत्वाखाली जतच्या समाजकारणात सक्रीय झालेले बसवराज काका पाटील यांची तत्वनिष्ठ नेतृत्व म्हणून ओळख होती. वयाच्या सतराव्या वर्षापासून त्यांनी समाजकारणात सक्रीय सहभाग नोंदवला होता.तब्बल पन्नास वर्षे त्यांनी जत तालुक्याच्या विकासासाठी आपले आयुष्य व्यतीत केले. प्रचंड अभ्यासू व शिक्षण क्षेत्रातील महर्षी म्हणून त्यांचा नावलौकीक होता.संखचे सरपंच, संख सोसायटीचे चेअरमन, जत कारखान्याचे संचालक, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष यासह काँग्रेसचे वीस वर्षे अध्यक्ष, जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष,जनसुराज्य पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेतृत्व त्यांनी केले होते.
१९ सप्टेंबर २०२३ साली त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या कार्याचे स्मरण कायम रहावे या उद्देशाने त्यांनी जत तालुक्यातील संख येथील निलांबिका शिक्षण संकुलाच्या राजारामबापू माध्यमिक प्रशालेच्या परिसरात सुशोभीत पूर्णाकृती पुतळा साकारण्यात आला आहे. या पुतळ्याचा अनावरण सोहळा आज शुक्रवारी देशाचे नेते शरद पवार यांच्या शुभहस्ते आणि आ. जयंतराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. या समारंभास आ.विनय कोरे, खासदार विशाल पाटील, कर्नाटकचे मंत्री शिवानंद पाटील, मंत्री एम.बी.पाटील, ज्येष्ठ नेते मोहनशेठ कदम, आ.विश्वजीत कदम, आ.विनय कुलकर्णी, माजी केंद्रीय मंत्री बसनगौडा पाटील, जतचे आमदार गोपीचंद पडळकर, संजयकाका पाटील, माजी आमदार विलासराव जगताप, विक्रमदादा सावंत, आ.रोहीत पाटील, आ.सुरेशभाऊ खाडे, आ.सत्यजित देशमुख, शिवाजीराव नाईक, मानसिंग भाऊ नाईक, आ.सुहास बाबर, सदाशिव पाटील, पृथ्वीराज देशमुख, अमरसिंह देशमुख, अजितराव घोरपडे, समित कदम, पुण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, स्व.राजारामबापूंचे अनुयायी, स्व.बसवराजकाका प्रेमी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमास जत तालुक्यातील जनतेनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन पत्रकार बैठकीत करण्यात आले आहे. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक प्रकाशराव जमदाडे, सुरेशराव शिंदे,मन्सूर खतीब, रमेश पाटील, सिध्दुमामा सिरसाड, साहेबराव टोणे, आय.एम.बिराजदार, मच्छिंद्र वाघमोडे, सदाशिव बिराजदार, शंकरराव गायकवाड यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.