आरवडे हायस्कुलमधील विद्यार्थ्यांना विषबाधा?

0
1

इस्कॉन मंदिरातील शिळा पुलाव दिला खायला : अनेक विद्यार्थ्यांना उलटी, मळमळ

   
तासगाव तालुक्यातील आरवडे येथील हायस्कुल शाळेतील अनेक विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. इस्कॉन (हरे राम, हरे कृष्ण) मंदिरातील कालचा शिळा पुलाव विद्यार्थ्यांना खायला दिल्याने हा प्रकार घडला. बाधित विद्यार्थ्यांवर आरवडे व मांजर्डे येथील आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.

  

याबाबत माहिती अशी : आरवडे येथे इस्कॉन मंदिर आहे. काल 26 जानेवारी रोजी या मंदिराचा वर्धापनदिन होता. त्यानिमित्ताने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या मंदिरात काल केलेला पुलाव उरला होता. हा पुलाव 'प्रसाद'  म्हणून आज हायस्कुल शाळेतील विद्यार्थ्यांना खायला दिला.

    

हा पुलाव विद्यार्थ्यांना खायला देताना शिक्षकांनी तो खाण्यायोग्य आहे की नाही, याची कोणतीही खातरजमा केली नाही. हा पुलाव खाताना अनेक विद्यार्थ्यांना तो विटलेला व आंबट असल्याचे समजले. मात्र तोपर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी निम्मा - अर्धा पुलाव खाल्ला होता. मात्र अनेक विद्यार्थ्यांची तक्रार येताना हा पुलाव माघारी घेण्यात आला.

   

मुळात काल सकाळी केलेला पुलाव आज दुपारी विद्यार्थ्यांना 'प्रसाद' म्हणून देताना कोणालाच लाज वाटली नाही. जनावरांना खायला द्यायच्या लायकीचा नसणारा हा पुलाव विद्यार्थ्यांना देण्याचा नालायकपणा मुख्याध्यापक व इस्कॉन मंदिराने केला. हा पुलाव खाल्ल्याने अनेकांना आज सायंकाळपासून त्रास होऊ लागला. विद्यार्थ्यांना उलट्या, मळमळ होऊ लागली.

    

विद्यार्थ्यांना पुलावमधूम विषबाधा झाल्याची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली. अनेक पालक दंगा करत गावात आले. ज्या विद्यार्थ्यांची तब्बेत बिघडली आहे त्यांच्यावर आरवडे व मांजर्डे येथील आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. आरोग्य विभागाचे पथक विद्यार्थ्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे.

   

हा प्रकार समजताच तासगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी के. पी. माने, तालुका आरोग्य अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांनी आरवडे येथे भेट दिली. दरम्यान, या प्रकारामुळे पालकांनी संताप व्यक्त केला आहे. या प्रकाराला जबाबरदार असणाऱ्या शिक्षकांवर कारवाई व्हावी, अशी मागणी पालकांनी केली आहे.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here