विकासकार्यातून दिवंगत आमदार अनिल बाबर यांच्या स्मृतींचे जतन

0
81

  • पालकमंत्री चंद्रकांत पाटील
  • ⁠विटा येथे दिवंगत आमदार अनिल बाबर यांना श्रद्धांजली

सांगली : उच्च पदावर असूनही दिवंगत आमदार अनिल बाबर यांनी सर्वसामान्य माणसाचे दुःख सदैव समजून घेतले. विद्यार्थ्यांनी त्यांचा नम्रपणा हा गुण घ्यावा. विकास कार्यातून अनिल बाबर यांच्या स्मृती चिरंतन जपल्या जातील, अशा शब्दात राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.


विटा येथे बाबर कुटुंबीयांच्या निवासस्थानी दिवंगत आमदार अनिल बाबर यांच्या प्रथम स्मृतिदिनी त्यांच्या प्रतिमेला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर एका शाळेत आयोजित अभिवादन कार्यक्रमात त्यांनी दिवंगत आमदार अनिल बाबर यांच्या स्मृतींना उजाळा दिला.


यावेळी आमदार सुहास बाबर, अमोल बाबर व बाबर परिवारातील सदस्य, मकरंद देशपांडे, मोहन व्हनखंडे, विटा मर्चंट बँकेचे चेअरमन विनोदराव गुळवणी, शिवाजी विद्यापीठ सिनेट सदस्या डॉ. मेघा गुळवणी, देवदत्त राजोपाध्ये, माजी नगरसेवक अनिलअप्पा बाबर आदि उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, दिवंगत आमदार अनिल बाबर यांनी मतदारसंघात केलेली विविध विकासकामे पुढील पिढ्यांना उपयोगी ठरतील. त्यांच्या वारशाचे जतन व्हावे. कार्यमग्न राहणे, सर्वसामान्य माणसाबद्दल आपुलकी या दिवंगत आमदार अनिल बाबर यांच्या गुणांचा आदर्श घ्यावा, असे ते म्हणाले.


बाबर यांच्या निवासस्थानी कलाशिक्षक शशिकांत आलदर यांनी रेखाटलेल्या दिवंगत आमदार अनिल बाबर यांच्या चित्राचे पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
०००००

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here