ऐकावे ते नवलचं ! महिला प्राध्यापकाचे विद्यार्थ्याशी लग्न

0
937

सायकॉलॉजी टीचरला सक्तीच्या रजेवर पाठवले; प्रशासनाकडून घटनेची चौकशी सुरू

बंगालमधील नादिया जिल्ह्यातील मौलाना अबुल कलाम आझाद तंत्रज्ञान विद्यापीठात एक अनोखी घटना घडली. येथे एका महिला प्राध्यापकाने तिच्याच वर्गात प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्याशी लग्न केले. ही घटना मंगळवारी घडली आणि त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.विद्यापीठ प्रशासनाने प्राध्यापकांना रजेवर पाठवले आहे आणि प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. प्राध्यापक म्हणतात की हा एका प्रकल्पाचा भाग होता, परंतु प्रशासनाने अद्याप याची पुष्टी केलेली नाही.

पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यात असलेल्या मौलाना अबुल कलाम आझाद तंत्रज्ञान विद्यापीठाच्या हरीघाटा कॅम्पसमध्ये ही विचित्र घटना घडली. ‘अप्लाईड सायकॉलॉजी’ विभागाच्या प्रमुख ज्या स्वतः एक महिला प्राध्यापक आहेत; मंगळवारी वर्गात लाल बनारसी साडी घालून आणि हातात फुलांचे हार घेऊन आल्या त्याच्यासोबत प्रथम वर्षाचा एक विद्यार्थीही होता. वर्गाच्या मध्यभागी विद्यार्थ्याने प्राध्यापकांच्या भांगेत सिंदूर भरला.

प्राध्यापकांचे स्पष्टीकरण

या प्रकरणावर, महिला प्राध्यापक पायल बॅनर्जी म्हणाल्या की, त्या वर्गात प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यासोबत ‘विवाहाचा सायकोड्रामा’ करत होत्या. त्यांनी (विद्यार्थ्यांनी) मला मुख्य भूमिका साकारण्याची विनंती केली आणि मी होकार दिला.इतर प्राध्यापकांना याची जाणीव होती आणि त्यांनी या कार्यक्रमाला सहमती दर्शवली होती.

कुलगुरू काय म्हणाले? : या घटनेवर विद्यापीठाचे कार्यवाहक कुलगुरू तापस चक्रवर्ती म्हणाले की, विभागप्रमुखांविरुद्ध चौकशी सुरू करण्यात आली आहे. तसेच त्यांना वर्गातील त्याच्या वर्तनाबद्दल स्पष्टीकरण देण्यास सांगण्यात आले आहे.

घटनेतून उपस्थित झाले प्रश्न : या घटनेने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. तो खरोखर एक प्रकल्प होता की आणखी काही? जर हा प्रकल्प होता, तर विद्यापीठ प्रशासनाला त्याची माहिती का नव्हती? आणि जर तो प्रकल्प नव्हता तर प्राध्यापकांनी तो का केला? विद्यार्थी कुठे आहे आणि त्याला याबद्दल काय वाटते? या सर्व प्रश्नांची उत्तरे अद्याप सापडलेली नाहीत.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here