अंजनीच्या प्रवीण पाटीलसह तिघांविरोधात गुन्हा दाखल : अवैध गौण खनिजचे उत्खनन रोखताना घडला प्रकार
अवैधरित्या सुरू असणारे मातीचे उत्खनन रोखणाऱ्या सर्कल व तलाठ्यांच्या पथकाला धमकवण्यात आले. वज्रचौंडे (ता. तासगाव) येथे गुरुवारी सकाळी हा प्रकार घडला. याप्रकरणी प्रवीण पाटील रा. अंजनी, ता. तासगाव) यांच्यासह दोन अनोळखी डंपर चालकांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मनेराजुरीच्या मंडल अधिकारी राजश्री सानप यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे.
याबाबत माहिती अशी : वज्रचौंडे - सावळज रोडवर शंकर बापू शिंदे यांच्या गट नंबर 198 मध्ये विनापरवाना मातीचे उत्खनन सुरू असल्याची माहिती महसूल सेवक अर्चना जाधव यांना मिळाली. ही माहिती त्यांनी मनेराजुरीच्या मंडल अधिकारी राजश्री सानप यांना सांगितली. त्यानंतर सानप यांच्यासह तलाठी अर्चना जाधव, उपळावीचे तलाठी आनंदा घेरडे, मनेराजुरीचे ग्रामसेवक प्रकाश पांढरे यांचे पथक वज्रचौंडे येथे पोहोचले.
यावेळी शंकर शिंदे यांच्या गट नंबर 198 मध्ये मोठ्या प्रमाणावर विनापरवाना मातीचे उत्खनन सुरू असल्याचे दिसून आले. जेसीबी व दोन डंपरच्या सहाय्याने मातीचे उत्खनन सुरू होते. यावेळी जेसीबी व डंपर चालकांना मातीच्या उत्खननाच्या परवान्याबाबत विचारले असता त्यांनी परवाना नसल्याचे सांगितले.
त्यानंतर वज्रचौंडेच्या पोलीस पाटील प्रणिता यादव यांना त्या ठिकाणी बोलावून घेण्यात आले. यावेळी पंचनामा करून वाहने तहसील कार्यालयात घेण्यास सांगण्यात आले. मात्र जेसीबी व डंपर चालकांनी आम्हास मालकांनी सांगितल्याशिवाय वाहन हलवणार नाही. तुम्हाला काय करायचे आहे ते करा. तुम्ही इथून जा, असे म्हणून अर्वाची भाषेत तलाठी व सर्कल यांच्या पथकाला धमकावले.
त्यानंतर जेसीबी व डंपर (एम. एच. 10, ए डब्ल्यू 7425) पळवून नेण्यात आला. तर (एम. एच. 10, सीआर 3254) हा डंपर पथकाने ताब्यात घेऊन तो तहसील कार्यालयात आणून लावला आहे. याप्रकरणी प्रवीण पाटील (रा. अंजनी, ता. तासगाव) यांच्यासह जेसीबी व डंपरच्या चालकांविरोधात तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनेराजुरीच्या मंडल अधिकारी राजश्री सानप यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विनय गोडसे करीत आहेत.