आयपीएल अर्थात इंडियन प्रीमियर लीगचे हे अठरावं वर्ष आहे. सलग अठरा वर्ष आपली लोकप्रियता टिकवून ठेवणारी आयपीएल ही जगातील एकमेव क्रिकेट लीग आहे. गेली अठरा वर्ष केवळ भारतातीलच नाही तर जगातील सर्वाधिक लोकप्रिय क्रिकेट लीग म्हणून आयपीएलकडे पाहिले जाते. जगभरातील अनेक दिग्गज खेळाडू या लीगमध्ये सहभागी होतात. मुळातच क्रिकेटला एका धर्माप्रमाणे स्थान असलेल्या भारतामध्ये आयपीएल सुरू असल्याने सहभागी संघाचे फॅन फॉलोअर्सची संख्या देखील खूप मोठी आहे.
आपल्या आवडत्या संघाला सपोर्ट करण्यासाठी फॅन मैदानावर गर्दी करताना दिसतात. आयपीएलचा सामना कोणत्याही मैदानावर, कोणत्याही शहरांमध्ये असो क्रिकेट रसिकांच्या उदंड प्रतिसादामुळे मैदाने तुडुंब भरली असल्याचे चित्र आपण दरवर्षीच पाहतो मात्र यावर्षी मैदानासोबतच मैदानाबाहेरही आपल्या आवडत्या संघाला सपोर्ट करण्यासाठी चाहत्यांमध्ये स्पर्धा लागली आहे. आजचे युग सोशल मीडियाचे युग आहे. सोशल मीडियाचा वापर न करणारा क्रिकेट चाहता शोधूनही सापडणार नाही.
आयपीएलमध्ये सहभागी असणाऱ्या सर्वच्या सर्व म्हणजे दहाच्या दहा संघाचे स्वतंत्र ट्विटर ( एक्स ) अकाउंटस आहेत. प्रत्येक संघाला ट्विटरवर ( एक्स ) फॉलो करणारे लाखो फॉलोअर्स आहेत. हे फॉलोअर्स ट्विटर वरून आपल्या आवडत्या संघाला सपोर्ट करत असतात. आयपीएलची मॅच चालू असताना ट्विट्स चा अक्षरशः पाऊस पडतो. सेकंदाला हजारो ट्विट्स येत असतात.
जो तो आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी ट्विट करत असतात. या सर्वांमध्ये मुंबई इंडियन्स आणि रॉयल बंगळुरू चॅलेंज या संघांचे फॅन फॉलोअर्स सर्वात जास्त आहेत. ट्विटर प्रमाणेच व्हाट्सएप, फेसबुक, इन्स्टाग्रामवर देखील चाहते आपल्या संघाला सपोर्ट करीत असतात. आपल्या आवडत्या संघाची मॅच असेल तर चाहते आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी व्हाट्सएपवर स्टेटस ठेवतात. सध्या सोशल मीडियाचं चित्र पाहिलं तर मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग व रॉयल चेलेंजर्स बंगळुरू या तीन संघांना सोशल मीडियावर चाहत्यांचा सर्वात जास्त सपोर्ट मिळताना दिसत आहे.
खेळाडूंमध्ये सर्वात जास्त सपोर्ट रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या विराट कोहली याला मिळत आहे. टी २० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला तरी विराट कोहलीची लोकप्रियता तसूभरही कमी झाली नाही उलट वाढतच चालली आहे हे सोशल मीडियावरुन लक्षात येते. दूरचित्रवाणीवर तर प्रेक्षक सामने पाहतच असतात पण ज्यांना दूरचित्रवाणीवर सामना पाहणे शक्य होत नाही ते मोबाईलवर सामना पाहतात. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा सामना कोणत्याही संघासोबत असला तरी प्रेक्षक त्यांचा सामना आवर्जून पाहतात. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सामना जिओ टीव्ही वर सर्वात जास्त पाहिला जातो.
करोडो प्रेक्षक जिओ टीव्हीवर सामने पाहतात. प्रत्येक सामन्याला करोडो प्रेक्षक मिळतात हा एक विश्वविक्रमच आहे. फेसबुक, व्हाट्सएपवर मॅच कोण जिंकणार याबद्दल चाहत्यांमध्ये पैजा लागत आहे. मॅच संपल्यानंतर मॅचवर आधारित तसेच प्रतिस्पर्धी खेळाडूंच्या खिल्ली उडवणाऱ्या मजेशीर मिम्स बनवून व्हायरल केल्या जात आहे. हे मिम्स बोलके असतात. यातून करमणूक तर होतेच पण संघाची सद्यस्थिती काय आहे हे देखील समजते. गुजरात टायटन संघाचा मुख्य प्रशिक्षक आशिष नेहरा खेळाडूंना सतत काही ना काही सल्ले देत असतो. ड्रिंक्स ब्रेक मध्ये तर तो कर्णधार आणि खेळाडूंना सल्ला देत असतोच पण सामना चालू असतानाही तो खेळाडूंचे डोके खात असतो.
वेडावाकडा चेहरा करून हातवारे करत तो खेळाडूंचे डोके खात असतो त्यामुळे त्याची खिल्ली उडवणारे अनेक मिम्स सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. चेन्नई आणि मुंबई संघ सध्या पराभवाच्या गर्तेत सापडले आहेत. सलग पाच सामन्यात पराभव झाल्याने चेन्नई संघ नेटिझन्सच्या निशाण्यावर आला असून या संघाची सोशल मीडियावर चांगलीच खेचली जात आहे. तीच गत मुंबईची आहे. मुंबईचाही सलग चार सामन्यात पराभव झाला आहे. त्यामुळे या दोन्ही संघांना सोशल मीडियावर टार्गेट केले जात आहे. या दोन्ही संघाचे आधारस्तंभ असलेले धोनी आणि रोहित शर्मा हे देखील आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करत नसल्याने त्यांची देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात खिल्ली उडवली जात आहे. प्रतिस्पर्धी संघाची आणि संघातील खेळाडूंची मजेशीर मिम्स आणि बनवून आणि मेसेज करून खिल्ली उडवतानाच नेटकरी आपल्या आवडत्या संघाला मात्र भरघोस पाठिंबा देत आहेत.
आपल्या आवडत्या संघाला भरघोस पाठिंबा देतानाच प्रतिस्पर्धी संघाची खिल्ली उडवून फॅन आयपीएलचा फिव्हर आणखी वाढवत आहे. एकूणच केवळ मैदानावरच नव्हे सोशल मीडियावर देखील आयपीएलचा फिव्हर वाढल्याचे दिसून येत आहे.
श्याम ठाणेदार,दौंड जिल्हा पुणे ९९२२५४६२९५