दुष्काळी जतची नवी ओळख,वाचा काय झालायं नेमका बदल..!

0
181

विस्ताराने मोठा असलेल्या जत तालुक्यासाठी राज्य शासनाने स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) सुरु करण्याचा शासकीय अध्यादेश परिवहन विभागाचे कक्ष अधिकारी जयसेन इंगोले यांनी जारी केला. या कार्यालयातून एमएच ५९ हा नोंदणी क्रमांक वाहनचालकांना मिळणार आहे. जतसाठी हा ऐतिहासिक निर्णय आहे. आ. गोपीचंद पडळकर यांच्या पाठपुराव्याचे हे मोठे यश असल्याची प्रतिक्रिया जतकरांनी व्यक्त केली आहे.

जत तालुक्यात १२० गावे व अनेक वाड्यावस्त्यांचा समावेश आहे. सांगलीपासून जतचे अंतर १०० किलोमीटर आहे. सांगलीत आरटीओचे कार्यालय असल्यामुळे जतकरांची अडचण होत होती. मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत आ. गोपीचंद पडळकर यांनी आपण निवडून आल्यास जतला स्वतंत्र आरटीओ कार्यालय मंजूर करणार असल्याचे अभिवचन जतकरांना दिले होते.

आ. पडळकर यांनी संयम राखत विरोधकांना कामातून उत्तर दिले आहे. लवकरच कार्यालय सुरु होणार असून सदर कार्यालयासाठी येणारा अंदाजीत आवर्ती खर्च व अनावर्ती खर्चाची तरतूद आगामी अधिवेशनात पुरवणी मागणीव्दारे करुन देण्यात येणार आहे. तोपर्यंत सदर खर्च उपलब्ध कार्यालयीन खर्चातून भागविण्यात यावेत असे निर्देश दिले आहेत. नवनिर्मित जत कार्यालयासाठी एक इंटरसेप्टर वाहनास मंजुरी देण्यात आली आहे. अधिकरी व कर्मचाऱ्यांच्या नियक्त्या करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

आ.पडळकरांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

शेवटचा मतदारसंघ असलेल्या जत विधानसभा मतदारसंघाला विकासात एक नंबरवर आणण्याचा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जतकरांना दिला आहे. जतला स्वतंत्र आरटीओ कार्यालय व्हावे, यासाठी आपण पाठपुरावा केला. त्याला यश आले असल्याबद्दल आ. पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

जतसाठी ऐतिहासिक निर्णय

जतकरांनी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता, की जतला स्वतंत्र आरटीओ कार्यालय होईल, पण ते महायुतीच्या शासनाने करुन दाखवले आहे. आ. गोपीचंद पडळकर यांच्या दूरदृष्टीमुळे हे शक्य झाले असून जतसाठी हा ऐतिहासिक निर्णय आहे. 

– डॉ. रवींद्र आरळी, भाजप नेते

जतकरांची होणार सोय

आ. गोपीचंद पडळकर यांनी शासन दरबारी पाठपुरावा करुन जतला आरटीओ कार्यालय मंजूर केले आहे. त्याचा फायदा हा सर्वसामान्यांना होणार आहे. सर्वसामान्य लोकांचा वेळ व पैसा वाचणार आहे. महायुती व आ. पडळकरांचे मनपूर्वक आभार. 

– सुनील पवार, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, जत

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here