जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात महिला, मुली आणि बालके यांच्याबाबत बेपत्ता (मिसिंग) झाल्याची नोंद आहे, मात्र, त्यांचा शोध लागतोच असे नाही. जिल्हा पो लीस दलाने आता बेपत्ता झालेल्यांचा शोध घेण्याची मोहीम युद्धपातळीवर हाती घेतली आहे. पोलिसांनी राबविलेल्या ‘ऑपरेशन मुस्कान’ मोहिमेंतर्गत महिनाभरात हरवलेल्या, घरातून निघून गेलेल्या २४० महिला, मुला-मुलींचा शोध घेण्यात आला. या मुलांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.
पोलिसांनी घडवून आणलेल्या या भेटीमुळे पालक व मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. हरवलेल्या किंवा पळवून नेलेल्या १८ वर्षांखालील बालकांचा शोध घेऊन ही मोहीम राबविली. दरम्यान, अद्यापही ६८८ जणांचा शोध घेण्याची कारवाई सुरु आहे. जिल्ह्यात मागील वर्षांपासून अल्पवयीन मुले, मुली तसेच महिलांचे बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले होते. कौटूंबिक वाद, प्रेम प्रकरण त्याचबरोबर वाद झाल्यावर घरातून निघून जाणे ही कारणे पुढे येत होती. सदरची बाब निदर्शनास येताच हरवलेल्या व अपहरण झालेल्यांचा शोध घेऊन त्यांना पुन्हा पालकांच्या स्वाधीन करण्यासाठी ऑपरेशन शोध ही मोहीम पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी हाती घेतली आहे. सांगली जिल्ह्यात एका महिन्याच्या कालावधीत युद्ध पातळीवर ही मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत पालकांशी वाद झाल्यानंतर घरातून निघून गेलेली मुले, अपहरण झालेल्या मुलांचा शोध घेतला जातो. गेल्या महिनाभरात जिल्ह्यात हरवलेली व अपहरण झालेल्या २४० महिला आणि ९ मुलींचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे.
जत, इस्लामपुरमध्ये सर्वाधिक तर शिराळ्यात सर्वात कमी प्रमाण
बेपत्ता, अपहरण दाखलचे प्रमाण जत आणि इस्लामपूर येथे सर्वाधिक आहे. जत पोलीस ठाण्यात १०५ आणि उमदी पोलीस ठाण्यात २९ मिसिंग दाखल आहेत. यापैकी जत पोलिसांनी १५ जणांना शोधले आहे तर उमदी पोलिसांनी अवघ्या चौघांचा शोध घेतला आहे. इस्लामपूर पोलिसांकडे ९५ महिला, आठ मुले आणि तीन मुली बेपत्ता झाल्याचे दाखल होते त्यातील ५४ महिलांना शोधण्यात यश आले आहे. शिराळा, कोकरूड आणि कुरळपमध्ये मिसिंगचे प्रमाण कमी आहे. तीन पोलीस ठाणे मिळून ३९ मिसिंग दाखल आहेत यातील ११ जणांना शोधण्यात यश आले आहे.
शोधमोहिमेची व्याप्ती वाढवणार…
जिल्ह्यामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणात शोधमोहीम राबवली आहे. ही मोहीम एक महिनाभर सुरु राहणार आहे. यामध्ये आणखी काही दिवस आहेत. त्यामुळे सध्या आम्हाला एकूण २४९ महिला, मुली आणि मुले यांचा शोध घेण्यात यश आले आहे. पोलीस महासंचालकांकडून राज्यभर मोहीम राबविली होती. महिला, मुली आणि मुले यांचा शोध घेण्याची मोहीम सुरु केली होती. त्याच अनुशंगाने आम्ही सांगलीत व्यापक मोहीम राबवत असल्याची माहिती प्रभारी पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.