जत : जत तालुक्यातील सोन्याळसह परिसरातील शेतकऱ्यांनी गेल्या काही महिन्यांपासून म्हैसाळ योजनेचे पाणी मिळावे, यासाठी संघर्ष सुरू केला होता. त्यांच्या आंदोलनाला यश आले आहे. माडग्याळ ओढ्यात म्हैसाळ योजनेचे पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे सोन्याळ परिसरातून समाधान व्यक्त होत आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून पाणीटंचाईमुळे शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली होती. पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी आवश्यक असणारे पाणी मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. दि. 15 मे रोजी सोन्याळ फाट्यावर रास्ता रोको आंदोलन केले होते. दरम्यान, म्हैसाळ योजनेच्या अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.
नियोजन करून लवकरात लवकर माडग्याळ ओढ्यात पाणी सोडले जाईल, असे पत्रात नमूद केले होते. या आश्वासनाची अंमलबजावणी झाली व पाणी सोडले.यामुळे गेल्या दोन वर्षांपासून पाण्याअभावी अडचणीत आलेल्या शेतीस पुन्हा उभारी मिळणार आहे.
सोन्याळसह परिसरातील शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या तत्परतेचे स्वागत करत यापुढील काळात शाश्वत व वेळेवर पाणीपुरवठा व्हावा, अशी मागणी केली. म्हैसाळचे पाणी पोहोचल्याने सोन्याळ परिसरातील शेतीला लाभ होणार आहे.