अलमट्टी येथे जाऊन आंदोलन करण्याची तयारी | सर्वपक्षीय नेत्यांकडून चक्काजाम आंदोलन

0
16

कोल्हापूर: गेल्या 2005, 2019 आणि 2021 साली कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला महापुराचा फटका बसला. याला सर्वात मोठं कारण हे कर्नाटक राज्यातील अलमट्टी धरण असल्याच समोर आलं. अलमट्टी धरणात कृष्णा नदीचं पाणी अडवल्यानं कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. असं असताना देखील कर्नाटक सरकारनं अलमट्टी धरणाची उंची आणखी ५२४ मीटर वाढवण्याचा घाट घातला आहे. कर्नाटक सरकारच्या या भूमिकेविरोधात सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी आंदोलन पुकारलं आहे. आज कोल्हापुरातील अंकली पुलाजवळ उदगाव येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. यावेळी, अलमट्टी धरणाबाबत महाराष्ट्र सरकारनं ठोस भूमिका घेतली नाही, तर अलमट्टीपर्यंत जाऊन आंदोलन करण्याचा इशारा आमदार सतेज पाटील आणि विश्वजीत कदम यांनी दिला आहे.

अलमट्टी धरणाची उंची ५१९ मीटरवरुन ५२४ मीटर करण्यासाठी कर्नाटक सरकारने केंद्र सरकारकडे मागणी केलेली आहे. याविरोधात राज्य सरकार ठोस भूमिका घेत नसल्याने कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील सर्वपक्षीय कृती समितीच्यावतीने रविवारी उदगाव-अंकली टोलनाक्यावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. सकाळी अकराच्या सुमारास चक्काजाम आंदोलनास सुरुवात झाली. यावेळी संतप्त आंदोलकांनी धरण तुमचे मरण आमचे, कर्नाटक सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणा देत सांगली-कोल्हापूर महामार्ग रोखला.

यावेळी आंदोलनस्थळी येणाऱ्या मार्गावर ठिकठिकाणी पोलिसांनी बॅरिकेटस् लावून मार्ग बंद केल्याने आमदार सतेज पाटील, आमदार विश्वजित कदम, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, अंकुशचे धनाजी चुडमुंगे यांनी पोलिसांना धारेवर धरल्याने वातावरण तणावपूर्ण बनले होते. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांची वाहने सोडल्याने तणाव निवळला. तीन तास चाललेल्या या चक्काजाम आंदोलनानंतर अलमट्टीच्या उंचीबाबत पाटबंधारे विभागाच्यावतीने बुधवारी (दि.२१) जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई मंत्रालयात बैठकीचे लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान, या आंदोलनामुळे सांगली-कोल्हापूर मार्ग बंद झाल्याने वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली होती. वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या.

सर्वपक्षीय नेत्यांकडून चक्काजाम आंदोलन : सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील कृष्णा, पंचगंगा, वारणा नदीकाठच्या गावांसह अन्य गावांना अलमट्टी धरणाच्या ५१९ मीटर उंचीमुळं महापुराचा फटका बसला असताना कर्नाटक सरकारनं अलमट्टी धरणाची उंची ५२४ मीटर करण्याचा घाट घातला आहे. या धरणाची उंची वाढवल्यास कोल्हापूर तसंच कराडपर्यंत संपूर्ण गावं पूरग्रस्त बनणार आहेत. यामुळं अलमट्टीची उंची वाढवण्याचा कर्नाटकचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी व महाराष्ट्र सरकारला जागे करण्यासाठी अंकली पुलाजवळ आज सर्वपक्षीय नेत्यांकडून चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात भाजपा, काँग्रेस, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, इरिगेशन फेडरेशन यांच्यासह इतर पक्ष ही सहभागी झाले होते. आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वात चाललेल्या या चक्काजाम आंदोलनात कर्नाटक सरकार, राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर तीव्र नाराजी दर्शवत जोरदार टीका करण्यात आली. अलमट्टीची उंची वाढीचा निर्णय जोपर्यंत रद्द होत नाही, तोपर्यंत सर्वपक्षीय आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा एल्गार यावेळी करण्यात आला.

यावेळी आमदार राहूल आवाडे, अरुण लाड, जयवंत आसगावकर, माजी आमदार संजय घाटगे, उल्हास पाटील, राजूबाबा आवळे, प्रकाश आवाडे, गणपतराव पाटील, सावकार मादनाईक, धनाजी चुडमुंगे, सर्जेराव पाटील आदींनी मनोगत व्यक्त केली. आंदोलनात रजनीताई मगदूम, राजवर्धन निंबाळकर, अमरसिंह पाटील, धनाजीराव जगदाळे, वैभव उगळे, सतीश मलमे, पी.एम.पाटील, अभिजित जगदाळे, अनंत धनवडे, विश्वास बालीघाटे, दिपक पाटील, विक्रांत पाटील, दादेपाशा पटेल यांच्यासह सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त, शेतकरी सहभागी झाले होते.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here