तासगाव : येथील तहसील कार्यालयाच्या समोर बसून अनेक कारनामे करणाऱ्या तोतया बॉण्ड रायटरला चोप दिल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली. सावळज येथील एका महिलेच्या दस्तासाठी सबंधिताने सुमारे 2 लाख 23 हजार रुपयांची मागणी केली होती. वास्तविक या दस्तासाठी केवळ 18 हजार स्टॅम्प ड्युटी होती. मात्र संबंधित तोतया स्टॅम्प रायटरने या महिलेकडून 2 लाख रुपये घेतले होते. तर उर्वरित 23 हजार रुपयांसाठी तगादा लावला होता. हा प्रकार संबंधित महिलेने घरी सांगितला. त्यानंतर या स्टॅम्प रायटरला पैसे देण्याच्या बहाण्याने सावळजमध्ये बोलावले. तिथे त्याला चांगलाच चोप दिला.
येथील तहसील कार्यालयात दुय्यम निबंधकांचे कार्यालय आहे. त्याठिकाणी तालुक्यातील जमिनींचे खरेदी – विक्री दस्त होतात. तर तहसील कार्यालयाच्या आवारात अनेक मुद्रांक विक्रेते दस्त तयार करून देण्याचे काम करतात. मात्र काही अनधिकृत बॉण्ड रायटरनी तहसील कार्यालयाच्या आवारात बस्तान बसवले आहे. लिटीगेशनमधील दस्तांच्या सुपाऱ्या घ्यायच्या, दुय्यम निबंधकाना ‘मॅनेज’ करायचे व बिनदिक्कतपणे हजारो, लाखो रुपये घेऊन हे दस्त करायचे, असे प्रकार सुरू आहेत. अशाप्रकारे अडचणीतील दस्त करून देणाऱ्या टोळ्या तहसील कार्यालयाच्या आवारात तयार झाल्या आहेत.
तोतया बॉण्ड रायटरनी तर अक्षरशः बाजार मांडला आहे. अगदी रीतसर दस्तालाही 5 ते 10 हजार रुपये घेतले जातात. दुय्यम निबंधक कार्यालयात साहेबांना द्यावे लागणारे वेगळे पैसे लोकांना मोजावे लागतात. त्याठिकाणी पैसे गोळा करणारी टोळी तयार झाली आहे. तोतया बॉण्ड रायटर व या टोळीचे साटेलोटे आहे. त्यामुळे सुपाऱ्या घेऊन अडचणीतील दस्त बिनबोभाटपणे केले जात आहेत.
अशाच एका तोतया बॉण्ड रायटरने काही दिवसांपूर्वी सावळज येथील एका महिलेच्या प्रॉपर्टीचा दस्त करून देण्याची सुपारी घेतली. सबंधित महिलेच्या असहाय्यतेचा फायदा घेत तिच्याकडून भरमसाठ पैसे उकळण्याचा ‘प्लॅन’ आखला. वास्तविक संबंधित महिलेच्या दस्ताला केवळ 18 हजार इतकी स्टॅम्प ड्युटी भरावी लागणार होती. मात्र या तोतया स्टॅम्प रायटरने तिला दस्तासाठी 2 लाख 23 हजार रुपये खर्च सांगितला.
संबंधित महिला याबाबत अज्ञान होती. तिनेही या तोतया बॉण्ड रायटरला 2 लाख रुपये ऍडव्हान्स दिला. त्यानंतर एकेदिवशी हा दस्त करण्यात आला. मात्र केवळ 18 हजार स्टॅम्प ड्युटी असणाऱ्या दस्ताला 2 लाख रुपये घेतल्याने संबंधित तोतया स्टॅम्प रायटर खुशीत होता. त्याला पैशांची चटक लागली होती. त्यांनतर उर्वरित 23 हजार रुपयांसाठी त्याने संबंधित महिलेला तगादा लावला. तिला सारखे फोन करू लागला.
दरम्यान, या महिलेला दस्तासाठी सुमारे 2 लाख 23 हजार रुपये लागतात, ही बाब खटकली. तिने दस्तासाठी खरंच इतके पैसे लागतात का, याबाबत चौकशी केली. त्यावेळी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. दुसरीकडे संबंधित तोतया बॉण्ड रायटरचा पैशासाठीचा तगादा थांबत नव्हता. वारंवार फोन करून तो पैशासाठी हैराण करत होता.
त्यानंतर संबंधित तोतया बॉण्ड रायटरला उर्वरित 23 हजार रुपये देण्याच्या बहाण्याने सावळज येथे बोलावून घेतले. तोही पैसे मिळणार या आशेने धावत – पळत सावळजला गेला. मात्र तिथे त्याचे बिंग फुटले. संबंधित महिलेच्या नातेवाईकांनी या बॉण्ड रायटरवर प्रश्नांची सरबत्ती केली. त्यावेळी तो हडबडून गेला. इतक्या पैशांबाबत विचारणा केली असता त्याची बोबडी वळू लागली. यावेळी त्याला या महिलेच्या कुटुंबीयांनी चांगलाच चोप दिला.
या प्रकाराने मुद्रांक विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली. तर दुय्यम निबंधक कार्यालय आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहिले. प्रचंड मोठी सेटलमेंट करून अडचणीतील दस्त होतात, हे अधोरेखित होऊ लागले. दरम्यान, या प्रकारानंतर दुय्यम निबंधकांनी संबंधित तोतया बॉण्ड रायटरला बोलावून चांगलेच झापल्याचे समजते. तर या बॉण्ड रायटरने संबंधित महिलेचा दस्त करताना एक बनावट परवानगी जोडल्याची चर्चा आहे. तसेच दुसऱ्या एका दस्तात इतर हक्कात बोजा असताना सातबारावर कागद ठेवून बोजा गायब करून कागद केल्याची चर्चा आहे. शिवाय पिकपाणीमध्ये बदल करून काही दस्त केल्याची चर्चा रंगत आहे.