‘पाक’प्रेमींवर कारवाई होणे गरजेचे !           

0
5

विविध प्रकारच्या मिठाई ही राजस्थानची एक वेगळी ओळख आहे. असे म्हणतात मिठाई खाण्यात राजस्थानी मंडळींचा हात कुणीच धरू शकत नाही. राजस्थानची राजधानी असलेल्या जयपूर शहरात तर नाक्यानाक्यावर मिठाईची दुकाने पाहायला मिळतात. पहलगाम हल्ल्यानंतर येथील मिठाईवाल्यांनी एक अनोखा निर्णय घेतल्याने जयपूरची चर्चा आज संपूर्ण देशभरात केली जात आहे. येथील सर्व प्रसिद्ध मिठाईना ‘पाक’ हा शब्द जोडला जातो. ‘गोंडपाक’, ‘म्हैसूरपाक’, ‘मावापाक’, ‘अंजीरपाक’, ‘काजूपाक’, ‘देसीपाक’ अशी या मिठाईंची नावे आहेत. यापुढे या मिठायांना ‘पाक’ ऐवजी ‘श्री’ हा शब्द जोडला जाणार आहे. त्यामुळे ‘गोंडपाक’चे नाव पालटून ‘गोंडश्री’ करण्यात आले आहे.

‘म्हैसूरपाक’चे नाव पालटून ‘म्हैसूरश्री’ करण्यात आले आहे. पाक या शब्दाप्रती द्वेष निर्माण झाल्याने समस्त मिठाईवाल्यांनी हा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानच्या निर्मितीच्याही आधी ‘पाक’ हा शब्द आपल्याकडे प्रचलित असला तरी पाकिस्तानप्रती द्वेष प्रकट करण्यासाठी जयपूरकरांनी घेतलेल्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. आजची देशाची स्थिती पाहता केवळ पदार्थाच्या नावातून ‘पाक’ शब्द हटवणे पुरेसे नसून भारतात राहून भारताचे खाऊन भारताशी वैरभावनेने वागणाऱ्या ‘पाक’प्रेमींना देशातून हटवण्याची आवश्यकता आहे. पहलगाम हल्ल्यानंतर समस्त भारतवासीयांनी पाकिस्तान प्रतीचा 

आपला द्वेष विविध माध्यमांद्वारे प्रकट केला. काही ठिकाणी पाकिस्तानचे राष्ट्रध्वज रस्त्यावर तर काही ठिकाणी पादचारी पुलांच्या पायऱ्यांवर चिकटवण्यात आले होते, तेव्हा तेथील पाकप्रेमींचे पाकप्रेम उफाळून आले आणि त्यांनी ते ध्वज काढण्याचा प्रयत्न केला तर काही ठिकाणी यावरून दंगली घडवण्याचाही प्रयत्न करण्यात आला. देशात वास्तव्य करणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांचा शोध घेत असताना देशातील लाखो महिलांनी पाकिस्तानी पुरुषांशी विवाह करून त्या आणि त्यांची मुले भारतातच राहत असल्याचे उघड झाले. या मंडळींकडे भारतीय नागरिकत्वाची सर्व कागदपत्रे होती. येथील सोयी सुविधांचा बिनदिक्कतपणे ही मंडळी लाभ घेत होती. याच दरम्यान पाकिस्तानच्या समर्थनार्थ सोशल मीडियातून पोस्ट करणारी काही मंडळीही उजेडात आली. खेळांच्या सामन्यात भारताचा पराभव झाल्यावर आणि पाकिस्तानचा विजय झाल्यावर फटाके फोडून आनंद व्यक्त करणारी पाकप्रेमी मंडळीही देशात बऱ्याच ठिकाणी आढळून येतात.

ज्या ज्या वेळी भारतात आतंकवादी हल्ले होतात तेव्हा त्यांना साहाय्य करणारी देशद्रोही मंडळी भारतातील वस्त्यांतूनच पकडली जातात. आतंकवाद्याच्या जनाज्याला लाखोंची गर्दी करणारी, आतंकवाद्यांचे वकीलपत्र  घेणारी, पाकिस्तानातून अवैधपणे भारतात येणाऱ्या घुसखोरांना आश्रय देणारी, त्यांच्या निवासाची आणि रोजीरोटीची सोय करणारी मंडळीही येथेच राहत आहेत. अशा ‘पाक’प्रेमी मंडळींना शोधून त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करणे आज निकडीचे असून त्यासाठी समस्त राष्ट्रप्रेमी नागरिकांनी संघटित होणे आवश्यक आहे. 

सौ. मोक्षदा घाणेकर, काळाचौकी, मुंबई 

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here