
छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातील आरडीसी म्हणजेच निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना ५ लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. ५ लाख रुपयांची लाच घेताना एसीबीने आरडीसीना रंगेहात पकडले. कारकुनामार्फत ही लाच घेण्यात येत होती. विनोद खिरोळकर असे अटकेतील अधिकाऱ्याचे नाव आहे.
वर्ग २ ची जमीन वर्ग १ करण्यासाठीपूर्वी या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी मोठ्या लाचेची मागणी केली होती. त्यानुसार, संबधित तक्रारदाराकडून २३ लाख रुपये घेतले होते. मात्र, तरीही १८ लाख पुन्हा मागण्यात आले.होते. त्यातील ५ लाख रुपयांची लाच घेताना आरोपीला अटक करण्यात आली. अव्वल कारकून त्रिभुवन याच्यामार्फत ही लाच घेतली जात होती. एसीबीने कारकुनालादेखील कारवाईसाठी ताब्यात घेतले आहे.
उपजिल्हाधिकाऱ्याला अटक करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे याआधीही लाखो रुपये उकळल्यानंतर पुन्हा पैशांची मागणी केली होती. अनेक महत्त्वाचे प्रशासकीय निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्यानेच अशा प्रकारे लाच घेतल्याची ही घटना गंभीर आहे.
महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यात सरकारी अधिकाऱ्यांकडून लाच घेण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. कारण, एसीबीच्या धाडीत ग्रामसेवकापासून ते तहसीलदारांपर्यंत कारवाई केल्याची अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत. नुकतीच परभणी जिल्ह्यात महिला क्रीडा अधिकाऱ्यासही लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली होती.