– सुभाष पाटील : आ. पडळकर यांनी लक्ष देण्याचे आवाहन
जत : जत तालुक्यात ११७खेडी आणि २५० हून अधिक वाड्या – वस्त्या आहेत. जिल्ह्यात विस्ताराने सर्वात मोठा असणाऱ्या या तालुक्यातील गाव खेड्यांना जोडणारे वाड्या वस्त्यावरील पाणंद रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट आहे. या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी संख जिल्हा परिषद गटाचे नेते तथा संखचे उपसरपंच सुभाष बसवराज पाटील यांनी केली आहे.
सुभाष पाटील म्हणाले, जत तालुका हा विस्ताराने सर्वात मोठा आहे. या तालुक्यात वाड्या वस्त्यांची संख्या देखील अधिक आहे. तालुक्यातील मोठी आणि लोकसंख्या लोकवस्ती वाडेवस्त्यावरच राहते. परंतु या सर्व लोकांना गाव खेड्याशी जोडले जाताना पाणंद रस्त्यांच्या मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. अनेक गावातील वाडी वस्तीवर लोकांना पाणंद रस्तेच नाहीत. तर अनेक ठिकाणी रस्ता असूनही त्याची दुरुस्ती डागडुजी नसल्याने येथे वास्तव्य करणारी जनता, शेतकरी यांना दैनंदिन कामकाजासाठी ये-जा करताना मोठी कसरत करावी लागत आहे. या समस्येचा सर्वात जास्त फटका पावसाळ्यात बसतो.
यंदा मान्सून पूर्व पावसाने जोरदार हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे वाडी वस्तीवर राहणाऱ्या लोकांना याचा मोठा त्रास होत असल्याचे दिसत आहे. पावसाळ्यापूर्वी या रस्त्यांची दुरुस्ती व्हावी अशी सतत मागणी होते. परंतु प्रशासन याकडे अजिबात लक्ष देण्यास तयार नाही. तर दुसरीकडे राज्य सरकार आणि महसूल
विभागाने पानंद रस्ते किमान तीन मीटरचे असावेत अशा प्रकारचा अध्यादेश देखील काढला आहे. शिवाय अशा भागातील लोकांना कसलाही त्रास, समस्या येऊ नयेत याची काळजी घेणे जरुरीचे आहे. प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेऊन तातडीचा उपाययोजना कराव्यात. आ. गोपीचंद पडळकर यांनीही या प्रश्नाकडे लक्ष देऊन, अशा रस्त्यांचे सर्वेक्षण करून वाडी वस्तीवर राहणाऱ्या लोकांना न्याय द्यावा, अशी मागणी ही सुभाष पाटील यांनी केली आहे.