उमदी : उमदी (ता. जत) येथे कृषी विभागाच्या स्थापनेपासून जत पूर्वभागातील २९ गावांकरिता स्वतंत्र उमदी येथे कृषी मंडळ कार्यालय मंजूर आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी उमदी कार्यालयातून कारभार चालवावा, अन्यथा तालुका कृषी कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा उमदी मंडळ कृषी कार्यालयांतर्गत येणाऱ्या २९ गावांतील सरपंचांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.
उमदी मंडळ कृषी कार्यालयाचा कारभार जत येथून चालविला जात असून, यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे तत्काळ उमदी कृषी मंडळ कार्यालयांतर्गत येणाऱ्या उमदी, विठ्ठलवाडी, हळ्ळी, बालगाव, उटगी, निगडी बु,, लमाणतांडा, सुसलाद, सोनलगी, बेळोंडगी, बोर्गाबुद्रुक, बोर्गी खु., को. बोबलाद, मोटेवाडी को, करेवाडी को., गुलगुंजनाळ, तिकोंडी, करेवाडी, जालीहाळ बु., करजगी, भिवर्गी, कांगनरी, कोणबगी, गिरगाव, आकळवाडी, लवंगा या २९ गावांतील शेतकऱ्यांची हँडसाळ थांबविण्यासाठी संबंधित उमदी येथील नियुक्त असलेल्या मंडळ कृषी अधिकाऱ्यांनी उमदी कार्यालयातून आपला सर्व कारभार पाहावा. अन्यथा तालुका कृषी कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा उमदी कृषी मंडळ कार्यालयांतर्गत येणाऱ्या गावातील सर्व सरपंच, उपसरपंच व शेतकरी यांच्यावतीने देण्यात आलेला आहे.
यावेळी उमदीचे सरपंच मुतू तेली, उपसरपंच मलकारी बाबर, सोनलगीचे सरपंच पराप्पा व्हणेकर, सुसलादचे सरपंच परशुराम टेंगळे, जालियाळचे सरपंच मलकारी पुजारी, उटगीचे सरपंच महादेव कांबळे यांसह इतर गावांतील सरपंच, उपसरपंच यांसह मान्यवर उपस्थित होते.