जत : मल्लाळ (ता. जत) येथे शेततलावाजवळ खेळत असताना पाय घसरून एका आठ वर्षांच्या चिमुकलीचा बुडून मृत्यू झाला, तर तिच्या लहान भावाला वाचविण्यात यश आले. श्रावणी दीपक माने असे मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव असून तिचा लहान भाऊ आदित्य (वय ५ वर्षे) यर्याला परिसरातील नागरिकांनी तत्काळ पाण्यातून बाहेर काढल्याने त्याला जीवदान मिळाले आहे.
आज सायंकाळी ६.१५ च्या सुमारास ही घटना घडली. या दुर्दैवी घटनेने गावावर शोककळा पसरली आहे. ही घटना मल्लाळ गावचे पोलिस पाटील शिवाजी सरगर यांनी जत पोलिस ठाण्यास दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला.
ग्रामस्थांनी व पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, दीपक माने हे शेतकरी आहेत. शेताच्या कामानिमित्त ते बाहेर गेले होते. आजी घराच्या अंगणात बसली होती. श्रावणी व आदित्य हे घरा शेजारीच असलेल्या शेततलावाजवळ खेळत होते. खेळता-खेळता श्रावणी ही पाय घसरून शेत तलावात पडली. तिला हात देत असताना आदित्य ही पाण्यात पडला. त्याचा ओरडण्याचा आवाज ऐकून शेजारीच असलेल्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, आदित्य पाण्यावर तरंगत असताना शेजारीच राहणाऱ्या एकाने पाण्यात उडी घेऊन त्याला पाण्याबाहेर काढले. त्याची प्रकृती स्थिर आहे. मात्र, श्रावणी हिला वाचविण्यास उशिरा झाल्याने तिचा या घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला. श्रावणी ही आता पहिलीतून दुसरीच्या वर्गात गेली आहे. या घटनेने मल्लाळ गावातच हळहळ व्यक्त होत आहे. सायंकाळी ७ च्या सुमारास श्रावणीचा मृतदेह जत ग्रामीण रुग्णालय येथे आणण्यात आला होता. या घटनेची उशिरापर्यंत जत पोलिस ठाण्यात नोंद झालेली नव्हती.