अहमदाबाद : गुजरातच्या अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातामध्ये सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. एपी वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे. या विमानातून २४२ प्रवासी प्रवास करत होते. यामध्ये दोन पायलट, १० क्रू मेंबर्स आणि २३० प्रवाशांचा समावेश आहे. या सर्वच्या सर्व प्रवाशांचा या अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला.

अपघातग्रस्त विमान अहमदाबादहून लंडनला निघाले होते. एअर इंडियाच्या या विमानात १६९ भारतीय प्रवासी, ५३ ब्रिटीश प्रवासी, ७ पोर्तग्रीज प्रवासी आणि १ कॅनेडियन प्रवासी प्रवास करत होते. तसंच, या विमानात १० कॅबिन क्रू आणि २ पायलट हे देखील होते. या विमानाने अहमदाबाद विमानतळावरुन उड्डाण घेतलं होतं. उड्डाण घेतल्यानंतर ५ मिनिटांमध्येच हे विमान कोसळले. ७०० फुटांहून खाली कोसळल्यानंतर या विमानाने पेट घेतला.
गुजरातमधील अहमदाबादमध्ये गुरुवारी दुपारी एअर इंडियाच्या विमानाला अपघात झाला. एअर इंडियाचे विमान एआय-१७१ ने भारतीय वेळेनुसार दुपारी १:३९ वाजता टेकऑफ केला. अवघ्या ५ मिनिटांत हे विमान कोसळले. सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ ही घटना घडली. हे विमान मेघानीनगर या रहिवासी परिसरात कोसळल्यानंतर भीषण आग लागली आणि परिसरात सगळीकडे धुरांचे लोट पसरले. अपघातानंतर विमानाचे तुकडे-तुकडे झाले. विमानाचा सांगाडा राहिला आहे.प्रवाशांमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा देखील समावेश होता.
विमानाला अपघात झाल्यानंतर अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने आग विझवण्याचे प्रयत्न केले. घटनास्थळावर बचावकार्य आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. बीएसएफ आणि एनडीआरएफची टीम अपघातस्थळी मदतकार्य करत आहे. अपघातग्रस्त विमान बोईंगचे ७८७ ड्रीमलायनर असल्याचे सांगितले जात आहे. हे विमान ११ वर्षे जुने होते.