जत : तालुक्यातील बनाळी जिल्हा परिषद मतदार संघ राजकीयदृष्ट्या नेहमीच चर्चेत राहिला आहे. यंदाची निवडणूक टोकाची व रंगतदार असणार आहे. भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या प्रमुख पक्षांत लक्षवेधी लढत पाहायला मिळणार आहे. शिवाय, महायुतीचे दोन पक्ष वेगवेगळ्या भूमिकेत दिसणार आहेत. मात्र, आरक्षणानंतर प्रमुख राजकीय घडामोडींना वेग येईल.गत पंचवार्षिक निवडणुकीत माजी आमदार विलासराव जगताप यांच्या गटाच्या सुनीता सुनील पवार, तर येळवी गणातून मंगल प्रकाशराव जमदाडे निवडून आल्या होत्या. बनाळी गणात मात्र माजी आमदार विक्रमसिंह सावंत गटाचे रवींद्र सावंत विजयी झाले होते. या मतदार संघात सावंत यांच्यापेक्षा जगताप गटाची मोठी ताकद होती.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीत जगताप व सावंत यांचा बराच गट भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गोटात सामील झाला आहे. त्यामुळे जगताप व सावंत गटाला मतदार संघात नव्याने राजकीय गणिते मांडावी लागतील.शिवाय, पडळकर यांचीदेखील स्थानिक स्वराज्य संस्थेची ही पहिली निवडणूक आहे.
त्यामुळे मतदार संघातील दांडगा अनुभव पाठीशी ठेवावा लागणार आहे. शिवाय, बनाळी मतदार संघात अनेकदा महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे जिल्हा बँकेचे संचालक प्रकाशराव जमदाडे यांची देखील ताकद आहे. त्यांच्या पाठीशी अनेक वर्षांचा अनुभव आहे.
ते कोणत्या गटाला पाठिंबा देतात, हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे. सुनील पवार हे देखील मतदार संघात सक्रिय आहेत. त्यामुळे त्यांची साथ कोणत्या गटाला असणार, यावरही राजकीय समीकरणे मांडली जाणार आहेत.
आमदार गोपीचंद पडळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते विलासराव जगताप, काँग्रेस नेते विक्रमसिंह सावंत यांच्यासाठी या मतदार संघाची निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे, हे येणारा काळच ठरवेल. मात्र, मतदारसंघात सर्व नेत्यांची मोर्चेबांधणी सुरू आहे. आरक्षण कोणतेही असो, आपलाच उमेदवार निवडून आणण्यासाठी नेत्यांना शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत.
बनाळी गटातील गावे
बनाळी गणात बनाळी, लोहगाव, आवंढी, अंतराळ, वायफळ, रेवनाळ, अचकनहळळी, तर येळवी गणात येळवी, खैराव, कुणीकोनूर, टोणेवाडी, घोलेश्वर, सनमडी, निगडी खुर्द, काराजनगी आदी गावांचा समावेश आहे