जत : जत नगरपरिषदेच्या तिसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीस अजून अधिकृत घोषणा झालेली नसली तरी प्रभागरचनेचे काम प्रशासनाकडून सुरू झाले असून इच्छुकांची आतापासूनच तयारीला सुरुवात केली आहे त्यामुळे जत शहराच्या राजकीय वातावरणात कमालीची चुरस जाणवू लागली आहे. इच्छुक उमेदवार, राजकीय कार्यकर्ते आणि प्रमुख गटांनी तयारीला सुरुवात केली असून, प्रत्येक वॉर्डात संभाव्य अनेक उमेदवारांचे नावे चर्चेत आहेत.
राजकीय गटांमध्ये सत्तेच्या खुर्चीसाठी आताच चढाओढ सुरू झाली आहे. काही जुने सहकारी आता वेगवेगळ्या पक्षात व गटांत विरुद्ध उभे राहण्याच्या तयारीत आहेत, तर काही नवीन चेहरे मतदारांच्या चर्चेचा विषय ठरत आहेत. गेल्या पंचवार्षिक कार्यकाळात नगरपरिषदेच्या कार्यक्षमतेबाबत जनतेत संमिश्र प्रतिक्रिया गटबाजी नव्हे, तर काम करणाऱ्या, जनतेचा विश्वास संपादन करणाऱ्या उमेदवारांचीच चलती राहणार, असा जनतेतून सूर उमटत आहे.
मूलभूत प्रश्नांवर लोकांचा भर
रस्ते, नळपाणी योजना, आरोग्य सुविधा, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन अशा मूलभूत सुविधांवर जनतेचा भर आहे. सध्या मतदारही अधिक जागरूक आणि प्रश्न विचारणारे झाले आहेत. त्यामुळे कोणता उमेदवार निवडून द्यायचा याचा निर्णय गट, जात, धर्म वा पक्षाच्या आधारावर न घेता, कार्यक्षमतेच्या आधारे घेतला आली आहे. बाब निरीक्षणात दिसून सध्या जत शहरात चार प्रमुख राजकीय गट निवडणूक लढवण्याच्या तयारीत असून, इतरही काही गट सक्रिय होण्याची शक्यता आहे.
विलासराव जगताप गट
माजी आमदार विलासराव जगताप यांनी राष्ट्रवादी (अजित पवार गट) मध्ये प्रवेश केल्यानंतर नव्याने सक्रिय झाले असून, जगताप सत्तेत भाजपबरोबर असले तरी जतच्या निवडणुकीत पवार गट लढणार आहे.
सुरेश शिंदे गट
गेल्या दोन्ही निवडणुकांत त्यांची पकड ठसठशीत राहिलेली असून, अनेक प्रभागांत त्यांचा सक्रिय जनसंपर्क टिकून आहे.
काँग्रेस विक्रम सावंत गट
माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांचा प्रभाव अजूनही जत शहरात असून, काँग्रेसम धील मरगळ बाजूला सारून यंदा ते नव्याने जोरदार तयारीला लागले आहेत.
भाजप- गोपीचंद पडळकर गट :ही निवडणूक या आ.पडळकर गटाची पहिलीच थेट चाचणी ठरणार आहे तरी, पडळकर यांचा आक्रमकपणा आणि प्रभाव लक्षात घेता त्यांना दुर्लक्षित करता येणार नाही.राष्ट्रवादी शरद पवार गट जिल्हा व तालुका स्तरावर काही कार्यकर्ते शरद पवार गटाशी निष्ठावान राहून स्वतंत्र तयारी करत आहेत. काही वॉर्डातून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.
शिवसेना (शिंदे व ठाकरे गट) : जत शहरात शिवसेना गटांचे थेट प्राबल्य कमी असले तरी, काही ठिकाणी ते इतर गटांसोबत युती करत लढण्याचा प्रयत्न करण्यातची शक्यता आहे.
मागील निवडणुकांचे राजकीय चित्र : २०१२ मध्ये झालेल्या पहिल्या निवडणुकीत सुरेश शिंदे गटाला ८, काँग्रेसला ७ आणि जगताप गटाला ३ जागा मिळाल्या होत्या. शिंदे आणि जगताप गटाने एकत्र येत सत्ता स्थापन केली.दुसऱ्या निवडणुकीत काँग्रेसने नगराध्यक्ष पदासह सात जागा जिंकून पुढाकार घेतला होता आणि त्यांनी शिंदे गटासोबत पुन्हा सत्ता मिळवली होती.
नगराध्यक्ष पदाबाबत उत्सुकता : यंदा नगराध्यक्ष पद ओपन राहण्याची शक्यता असून, त्यामुळे अनेक दिग्गज आणि नवोदित इच्छुक रिंगणात उतरतील. या पदासाठी गटांतर्गत चाचपणी सुरू झाली आहे. अंतिम उमेदवार कोण होणार, यावर अनेक राजकीय समीकरणं अवलंबून राहतील.
खुर्चीसाठी काय पण : जत नगरपरिषद निवडणूक ही यंदा केवळ गटबाजीवर नव्हे, तर मतदारांच्या अपेक्षांवर आधारित रंगणार आहे. मतदारांचा दृष्टिकोन अधिक विचारशील आणि विकासाभिमुख झालेला आहे. त्यामुळे पारंपरिक राजकारणाला झुगारून, स्थानिक प्रश्नांवर ठोस भूमिका घेणाऱ्यांनाच यश मिळेल. राजकीय गोटात उलथापालथ सुरू असतानाच, नगरसेवक व नगराध्यक्ष पदांसाठी इच्छुकांनी जोर धरायला सुरुवात केली आहे.खुर्चीसाठी काय पण’ हे चित्र खरे असले तरी जनतेच्या हक्कासाठी संघर्ष करणारी नवी राजकीय दिशा यंदाच्या निवडणुकीतून ठरेल,अशी अपेक्षा आहे.
‘