जत : माडग्याळ (ता. जत) येथील लकडेवाडी ते जाडरबोबलात मार्गे लंवगीकडे जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण नुकतेच पूर्ण झाले होते. मात्र, अवघ्या काही दिवसांतच रस्त्यावर मोठाले खड्डे पडू लागल्याने रस्त्याची दुरवस्था झाली असून, कामाच्या गुणवत्तेबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
सदर रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याच्या तक्रारी स्थानिक ग्रामस्थांनी केल्या आहेत. काही ठिकाणी रस्ता पूर्णतः उखडून गेला असून, यामुळे अपघाताचेही प्रकार घडण्याची शक्यता आहे.
या संदर्भात जाडरबोबलात ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच प्रकाश काटे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जत उपविभागीय अभियंत्यांकडे तक्रार अर्ज सादर केला आहे.
“रस्त्याची सद्यस्थिती पाहता कामात हलगर्जीपणा झाल्याचे स्पष्ट आहे. याप्रकरणी संबंधित ठेकेदारावर तात्काळ कारवाई करण्यात यावी,” अशी मागणी काटे यांनी आपल्या अर्जात केली आहे.
ही बाब राज्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या निदर्शनासही आणून देण्यात आली आहे.
रस्त्याच्या कामात झालेल्या अनियमिततेची चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी जोरदार मागणी सध्या परिसरात केली जात आहे.




