नागपूर : सोशल मीडियाच्या माध्यमातून पुरुषांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून सातत्याने विवाह करत त्यांची फसवणूक करणाऱ्या एका ‘लुटारू वधू’ला अखेर नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. ही महिला तब्बल आठ लग्न करून पतींकडून मानसिक, शारीरिक छळाच्या नावाखाली पैसे उकळत होती.
उच्चशिक्षित आणि शिक्षक म्हणून कार्यरत असलेली ही महिला सोशल मीडियावरून पुरुषांशी ओळख वाढवत असे. एकदा विश्वास संपादन झाला की, लग्नाचा प्रस्ताव मांडून ती विवाह करायची. त्यानंतर काही काळातच पतीविरुद्ध छळाच्या आरोपाखाली तक्रार दाखल करून पैसे उकळायची, अशी तिची योजना होती.
पोलिसांना गुलाम पठाण या पतीने दिलेल्या तक्रारीवरून तपास सुरू केला होता. तपासादरम्यान ही महिला तब्बल दीड वर्षापासून फरार असल्याचं उघड झालं. अखेर सखोल तपासाच्या आधारे पोलिसांनी तिला अटक करण्यात यश मिळवलं आहे.
सध्या तिच्या इतर पतींचाही तपास सुरू असून, आणखी काही फसवणुकीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता आहे. नागपूरसह इतर जिल्ह्यांमध्येही तिच्या कारवायांचा शोध घेण्यात येत आहे.
या प्रकारामुळे ‘लुटारू वधू’ची चर्चा राज्यभर रंगली असून, सोशल मीडियावर देखील यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.




