जत (जि. सांगली) : महसूलदिनीच जत तालुक्यातील महसूल विभागाच्या कारभारातील अनागोंदी समोर आली आहे. शेगाव येथील शेतकरी विठ्ठल बुरुटे यांच्या सातबारा दुरुस्ती अर्जावर तब्बल ७ वर्षांपासून सुनावण्या सुरू असूनही निकाल लागलेला नाही. दोन तहसीलदारांच्या काळात एकूण १५ वेळा सुनावण्या घेण्यात आल्या, तरी अद्याप तोच ठप्प कारभार सुरू आहे.
युवा नेते विक्रम ढोणे यांनी महसूल दिनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर सडकून टीका केली. अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेळेच्या शिस्तीपासून ते नागरिकांच्या आर्थिक शोषणापर्यंत अनेक मुद्दे उपस्थित करत त्यांनी प्रांताधिकारी व तहसीलदार यांची भूमिका संशयास्पद असल्याचा सवाल केला.
ढोणे यांनी महसूल सप्ताहात लोकसेवा हक्क कायद्याची माहिती सर्व कार्यालयांमध्ये प्रसिद्ध करण्याची मागणी केली असून, अन्यथा शेवटच्या दिवशी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
१५५ सातबारा दुरुस्ती अर्जाला ७ वर्षांपासून निकाल नाही; प्रशासनाच्या दिरंगाईचा नमुना
शेगाव (जत) येथील शेतकरी विठ्ठल बुरुटे यांनी २० डिसेंबर २०१९ रोजी सातबारा दुरुस्तीचा अर्ज दाखल केला होता. त्यानंतर मंडल अधिकारी, शेगाव यांनी २२ जून २०२१ रोजी अहवाल सादर केला.
त्यानंतर तत्कालीन तहसीलदार जीवन बनसोडे यांनी १७ जुलै, ३१ जुलै, १४ सप्टेंबर, २२ नोव्हेंबर, २२ डिसेंबर २०२१ आणि १० जानेवारी, १४ मार्च, २० जून, २४ जुलै २०२२ रोजी सुनावण्या घेतल्या.
सध्याचे तहसीलदार प्रविण धानोरकर यांनीही २४ डिसेंबर, ३१ डिसेंबर २०२४ आणि १५ व २९ जानेवारी २०२५ रोजी सुनावण्या घेतल्या. मात्र, इतक्या वर्षांनंतरही कोणताही अंतिम निर्णय देण्यात आलेला नाही, हे प्रशासनातील दिरंगाई आणि उदासीनतेचे जिवंत उदाहरण ठरते.




