सांगली : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत सांगली जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून, जिल्हा मध्यवर्ती बँक व राष्ट्रीयकृत बँकांमधील एकूण ३७ हजार ८६५ शेतकरी या टप्प्यात पात्र ठरले आहेत. पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी आपल्या गावातील आपले सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणिकरण करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष आणि जिल्हा उपनिबंधक सुनील चव्हाण यांनी केले आहे.
योजनेतील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, विकास सेवा सोसायटी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तसेच संबंधित राष्ट्रीयकृत बँकांच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. त्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांनी आपले नाव यादीत तपासून तातडीने आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
तालुकानिहाय पात्र लाभार्थ्यांमध्ये जत तालुका सर्वाधिक ११,५१८ शेतकऱ्यांसह अव्वल ठरला आहे. त्याखालोखाल तासगावमध्ये ५,४९६, मिरजमध्ये ५,४०३, वाळव्यात ३,४८१, कवठेमहांकाळमध्ये २,८७२, पलूसमध्ये २,५१६, कडेगावमध्ये १,७९५, आटपाडीमध्ये १,७२५, विट्यात १,६१७, शिराळ्यात १,४२५ आणि सांगली तालुक्यात १७ शेतकरी पात्र ठरले आहेत.
कर्जमुक्ती योजनेची ही पहिली यादी असून, पात्र शेतकऱ्यांनी वेळेत आधार प्रमाणिकरण करून घेतल्यास कर्जमुक्तीचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.




