कवठेमहांकाळ : (बाबासाहेब पाटील) : तालुक्याचा मानबिंदू आणि आर्थिक कणा मानल्या जाणाऱ्या श्री महांकाली सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीला आता चांगलीच रंगत आली आहे. गावागावांत प्रचारसभा, बैठका आणि मतदारांच्या गाठीभेटींना वेग आला असून, कारखान्याचे भवितव्य ठरविणाऱ्या या निवडणुकीकडे संपूर्ण कवठेमहांकाळ तालुक्याचे लक्ष लागले आहे.
महांकाली साखर कारखाना बंद असल्याने तालुक्याच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. कारखान्यावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे अवलंबून असलेल्या हजारो कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचबरोबर ऊस उत्पादक शेतकरी, वाहतूकदार, व्यापारी, छोटे व्यावसायिक आणि विविध घटकांवरही कारखाना बंद पडल्याचा परिणाम झाला आहे. कारखान्याच्या माध्यमातून होणारी आर्थिक उलाढाल थांबल्याने स्थानिक बाजारपेठेवरही त्याचा परिणाम जाणवत आहे.
अशा पार्श्वभूमीवर होत असलेली यंदाची निवडणूक सभासदांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. कारखाना पुन्हा सुरू करून त्याला गतवैभव मिळवून देण्यासाठी सक्षम नेतृत्व कोण देणार, हा प्रमुख प्रश्न सभासदांसमोर आहे. त्यामुळे केवळ उमेदवारांची निवड न करता कारखान्याच्या भवितव्याचा निर्णय या निवडणुकीत होणार असल्याचे चित्र आहे.
पॅनेल टू पॅनेल लढतीने चुरस
कारखान्याच्या इतिहासात प्रथमच पॅनेल टू पॅनेल अशी थेट लढत होत असल्याने निवडणुकीतील चुरस वाढली आहे. एका बाजूला सत्ताधारी पॅनेलच्या पाठीशी तालुक्यातील प्रस्थापित राजकीय नेते आणि आर्थिक ताकद असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. तर दुसऱ्या बाजूला श्री महांकाली साखर कारखाना बचाव कृती समितीच्या पॅनेलच्या माध्यमातून सर्वसामान्य सभासद, कामगार आणि कारखाना वाचविण्याच्या भूमिकेला पुढे आणण्यात आले आहे.
ज्येष्ठ नेते संदीप आबा गिड्डे-पाटील आणि मिलिंद बापू कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली बचाव कृती समितीचे पॅनेल निवडणूक रिंगणात उतरले आहे. बंद कारखाना पुन्हा सुरू करण्याबरोबरच कामगार, ऊस उत्पादक आणि सभासदांच्या हिताला प्राधान्य देण्याचा मुद्दा या पॅनेलकडून प्रचारात मांडला जात आहे.
दुसरीकडे सत्ताधारी पॅनेलकडून कारखान्याच्या व्यवस्थापनाशी संबंधित अनुभव, संघटनात्मक ताकद आणि भविष्यातील विकासाच्या मुद्द्यांवर भर दिला जात आहे. त्यामुळे दोन्ही पॅनेलमधील प्रचार दिवसेंदिवस तीव्र होत असून मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.



