आटपाडी, दि. २२ : आटपाडी तालुक्यात दुष्काळाची तीव्रता वाढत असताना प्रशासन व लोकप्रतिनिधींकडून ठोस नियोजन होत नसल्याचा आरोप बळीराजा शेतकरी संघटनेने केला आहे. आमदार सुहास बाबर यांनी २८ सप्टेंबरपर्यंत आटपाडी येथे अधिकाऱ्यांसोबत दुष्काळी परिस्थितीचा आढावा घ्यावा, अन्यथा मुख्यमंत्री व कृषिमंत्र्यांचे पुतळे माणगंगा नदीच्या पुलावरून कोरड्या पात्रात सोडण्याचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संघटनेने दिला.
संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. उन्मेश देशमुख व पदाधिकाऱ्यांनी महसूल विभागाला निवेदन दिले. तालुक्याची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाऐवजी आटपाडीत घेऊन स्थानिक अधिकाऱ्यांना ठोस सूचना देण्याची मागणी करण्यात आली.
शेतकऱ्यांना दिवसा सलग आठ तास वीज, अटीविना सरसकट कर्जमाफी, चारा छावण्या व पाण्याच्या टँकरचे नियोजन करण्याची मागणी करण्यात आली. तसेच उत्तर आटपाडीतील टेंभू विस्तारीकरणाच्या कामाची तांत्रिक तपासणी करून त्रुटी दुरुस्त कराव्यात, अशी मागणीही संघटनेने केली.
आटपाडीतील दुष्काळी उपाययोजनांबाबत महसूल विभागाला निवेदन देताना बळीराजा शेतकरी संघटनेचे पदाधिकारी.




