आटपाडी लुटमार ; तिघे जेरबंद | सातारा जिल्ह्यातील संशयित : ६० हजारांचा सोन्याचा ऐवज, मोटारसायकल जप्त

0
0

आटपाडी : घरात घुसून वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची माळ जबरदस्तीने लुटताना प्रतिकार करणाऱ्या तिच्या मुलावर चाकूने वार करून जखमी करणाऱ्या सातारा जिल्ह्यातील तिघांना सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) अटक केली. आरोपींकडून सुमारे ६० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली.

१८ सप्टेंबर रोजी रात्री आठच्या सुमारास पळसखेल येथील कुचेकरवस्ती येथे ही घटना घडली. द्वारकाबाई साहेबराव कुचेकर यांच्या घरात कानटोपी व जॅकेट घातलेले तिघे घुसले. त्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची माळ जबरदस्तीने काढून घेतली. मुलगा भारत कुचेकर याने प्रतिकार केल्यावर आरोपींनी त्याच्यावर चाकूने वार केला आणि मोटारसायकलवरून पलायन केले.

याप्रकरणी आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नसल्याने पोलिसांनी तांत्रिक माहिती व गोपनीय बातमीदारांच्या आधारे तपास सुरू ठेवला. मिळालेल्या माहितीनुसार आटपाडी-दिघंची मार्गावरील हॉटेलसमोरून सोमनाथ मल्हारी चव्हाण (२३), राजू प्रल्हाद काळे (३१) आणि महादेव ऊर्फ प्रसाद श्रीकांत बुधावले (१९), तिघेही रा. वरकुटे-मलवडी, ता. माण, जि. सातारा, यांना ताब्यात घेण्यात आले.

सोमनाथ चव्हाण याच्याकडून ४ ग्रॅम ४०० मिली वजनाचे ४९ सोन्याचे लहानमणी असलेले दागिने जप्त करण्यात आले. त्याची किंमत सुमारे ६० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आटपाडीतील लूटप्रकरणी जप्त केलेले सोन्याचे दागिने व गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here