मृत्यू नव्हे, खून असल्याचा पोलिसांना सुगावा ? | जत तालुक्यात खळबळ

0
15

जत : जत तालुक्यातील पश्चिम भागातील एका गावात व्यक्तीचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचे सुरुवातीला समजले; मात्र तपासात हा मृत्यू नसून खून असल्याचा संशय समोर आला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने याप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतले असून चौकशी सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीच्या पत्नीचे एका व्यक्तीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरून काही दिवसांपूर्वी कुटुंबात वाद झाला होता. त्यानंतर पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा गळा आवळून खून केल्याचा पोलिसांचा प्राथमिक संशय आहे. मृत्यूनंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतर हृदयविकाराने मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.

शवविच्छेदन न झाल्याने मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आणि त्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र गावात मृत्यूबाबत संशयाची चर्चा सुरू होती. याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाल्यानंतर तपासाला वेग आला.

पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीत त्याने खुनाची कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे. मृत व्यक्तीचे जवळचे नातेवाईक नसल्याने पोलिसांकडून फिर्याद दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, जत पोलिस ठाण्यात अद्याप या घटनेची अधिकृत नोंद झालेली नाही. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून तपास सुरू असून संपूर्ण तपासानंतर अधिकृत माहिती दिली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here