पुणे : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत राज्य सरकारने गुरुवारी (२२ ऑक्टोबर) कर्जमाफीची चौथी यादी जाहीर केली. या यादीत राज्यातील १ लाख १५ हजार ६९७ पात्र शेतकऱ्यांचा समावेश असून, त्यात सांगली जिल्ह्यातील ८ हजार ४८४ शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
एकापेक्षा अधिक बँकांमध्ये पीककर्ज खाती असलेल्या आणि दोन लाख रुपयांपेक्षा कमी थकबाकी असलेल्या पात्र शेतकऱ्यांची नावे या यादीत प्रसिद्ध करण्यात आली आहेत. संबंधित शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी आधार प्रमाणीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यानंतर पात्र लाभार्थ्यांच्या कर्जखात्यात रक्कम जमा केली जाणार आहे.
राज्यात आतापर्यंत १३,२७५ कोटी जमा
या योजनेसाठी बँकांनी पोर्टलवर ३१ लाख १७ हजार थकीत कर्जखात्यांची माहिती अपलोड केली आहे. त्यावर प्रक्रिया करून आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या १५ लाख ८५ हजार पात्र लाभार्थ्यांच्या कर्जखात्यांत आतापर्यंत १३ हजार २७५ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत, अशी माहिती सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी दिली.
चौथ्या यादीत पुणे विभागातील ३० हजार २४७ शेतकऱ्यांचा समावेश आहे. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील १६ हजार २४६, सांगलीतील ८ हजार ४८४, साताऱ्यातील ४ हजार २८६, कोल्हापूरमधील ९३४ आणि सोलापूरमधील २९७ शेतकऱ्यांचा समावेश आहे.
या यादीमुळे अनेक बँकांकडील पीककर्ज थकबाकी असलेल्या पात्र शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी यादीतील नाव तपासून आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.


