शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीने सोडविण्याचे पडळकरांचे निर्देश
म्हैसाळ योजनेचे ९५ टक्के काम पूर्ण; जानेवारीअखेर तलावांसाठी पाणी उपलब्ध करण्याचे नियोजन
संख : जत तालुक्यातील दुष्काळ आणि पाणीटंचाईच्या प्रश्नांवर उपाययोजना करण्यासाठी भिवर्गी येथील श्री बिळेनसिद्ध देवस्थान परिसरात बुधवारी जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी शेतकरी आणि ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेत संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
या बैठकीस खासदार विशाल पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, डॉ. रवींद्र आरळी, माजी आमदार विक्रमसिंह सावंत, तम्मनगौडा रवी पाटील यांच्यासह जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, प्रांताधिकारी, गटविकास अधिकारी, अपर तहसीलदार, विविध विभागांचे अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, सरपंच आणि परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संख अपर तहसील कार्यालयांतर्गत येणाऱ्या चार महसूल मंडळांतील गावांच्या दुष्काळी परिस्थितीचा यावेळी सविस्तर आढावा घेण्यात आला. वीजपुरवठा, रस्ते, बंधारे, पाणीटंचाई, जनावरांसाठी चारा आणि शेतीसंबंधी विविध प्रश्न शेतकऱ्यांनी मांडले. प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्यांकडून समस्यांची माहिती घेऊन त्यावर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना आमदार पडळकर यांनी दिल्या.
म्हैसाळच्या पाण्याबाबत महत्त्वाची चर्चा
जत पूर्व भागातील गावांना म्हैसाळ योजनेचे पाणी मिळावे, यासाठी योजनेतील अडचणींचा आढावा घेण्यात आला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हैसाळ योजनेचे काम ९५ टक्के पूर्ण झाले आहे. जानेवारीअखेरपर्यंत तलाव भरण्यासाठी तीन टीएमसी पाण्याची आवश्यकता असून, सध्या एक टीएमसी पाणी उपलब्ध होणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. उर्वरित कामे पूर्ण करून शक्य तितक्या लवकर पाणी सोडण्याबाबत चर्चा झाली.
चारा अनुदान आणि वीज कनेक्शनचा प्रश्न ऐरणीवर
दुष्काळामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला असून, शेतकऱ्यांना चारा उपलब्ध करून द्यावा किंवा चाऱ्याऐवजी थेट त्यांच्या खात्यावर अनुदान जमा करावे, अशी मागणी करण्यात आली. तसेच सोन्याळ, जाडर बोबलाद आणि तिकोंडी परिसरातील शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे सादर करूनही विद्युत कनेक्शन मिळाले नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. यावर संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
दुष्काळी परिस्थितीत शेतकरी आणि ग्रामस्थांना दिलासा देण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत आणि नागरिकांना कार्यालयीन हेलपाटे मारावे लागू नयेत, यावर बैठकीत भर देण्यात आला.
तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या शेतीपंपांसाठी १२४ अतिरिक्त डीपी मंजूर करून घेतल्याबद्दल आमदार रोहित आर.आर.पाटील यांच्या पाठपुराव्याला यश आले. तासगाव तालुक्यात ६४, तर कवठेमहांकाळ तालुक्यात ६० डीपी मंजूर करण्यात आले आहेत.




