म्हैसाळ योजनेतून प्रथमच कुलाळवाडी-अंकलगीला पाणी दुष्काळमुक्त जतच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल! ; आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते पाणीपूजन

0
0

संख : कुलाळवाडी (ता.जत),दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या जत तालुक्यासाठी ऐतिहासिक ठरणारी घटना घडली आहे. म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या इतिहासात प्रथमच कुलाळवाडी, अंकलगी आणि राजोबाचीवाडी या गावांकडे पाणी सोडण्यात आले. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते पाणीपूजन करून पाण्याचे आवर्तन सुरू करण्यात आले. या निर्णयामुळे परिसरातील पाणीटंचाई दूर होण्याबरोबरच शेती आणि पशुपालनाला मोठा आधार मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

जत तालुक्यातील अनेक गावांना आजवर पाण्यासाठी संघर्ष करावा लागला आहे. पावसाच्या अनिश्चिततेमुळे शेतीचे मोठे नुकसान होत असून, पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर बनत होता. अशा परिस्थितीत कुलाळवाडी, अंकलगी आणि राजोबाचीवाडी परिसराला म्हैसाळ योजनेचे पाणी मिळणे हा स्थानिकांसाठी आनंदाचा आणि दिलासादायक क्षण ठरला.

‘दुष्काळमुक्त देवभूमी जत’ या संकल्पनेच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. पाणी उपलब्ध झाल्यामुळे शेतीच्या क्षेत्रात सकारात्मक बदल घडण्यास मदत होणार असून, शेतकरी आणि पशुपालकांच्या आर्थिक परिस्थितीलाही बळ मिळण्याची आशा आहे. अनेक वर्षांपासूनची पाण्याची प्रतीक्षा संपुष्टात येत असल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण होते.

यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रत्यक्ष पाणीपूजन करून आवर्तन सुरू केले. याप्रसंगी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक प्रकाश जमदाडे, जिल्हा परिषद सदस्य किरण पाटील, रमेश देवर्षी, पंचायत समिती सदस्य भाऊसाहेब दुधाळ, आप्पासाहेब बेडगे, उत्तमराव कट्टीमणी, आप्पासो दर्गाकर, माजी पंचायत समिती सदस्य सोमनाथ हाके, व्हसपेठचे सरपंच भगवंत तुरई, कुलाळवाडीचे सरपंच बजरंग कुलाळ, अंकलगीचे सरपंच परमेश्वर बिराजदार यांच्यासह परिसरातील विविध पदाधिकारी, ग्रामस्थ आणि शेतकरी उपस्थित होते.

तसेच म्हैसाळ योजनेचे कार्यकारी अभियंता मासाळ, उपअभियंता गडदे, सिद्धू पुजारी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. या ऐतिहासिक पाणीप्रवाहामुळे जतच्या दुष्काळी पट्ट्यात हरितक्रांतीची नवी आशा निर्माण झाली आहे.

फोटोओळ : कुलाळवाडी, अंकलगी व राजोबाचीवाडी येथे म्हैसाळ योजनेतून प्रथमच पाणी सोडण्यात आले. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते पाणीपूजन करण्यात आले. उपस्थित पदाधिकारी, अधिकारी, ग्रामस्थ व शेतकरी

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here