खानापूर : शक्तीपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीला सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविल्याने प्रशासनाला माघार घ्यावी लागली. खानापूर तालुक्यातील माहुली येथे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी तब्बल आठ तास ठिय्या आंदोलन केले. अखेर प्रांताधिकारी, संबंधित अधिकारी आणि सुमारे ८०० पोलिसांचा बंदोबस्त मोजणी न करताच परतला.
मंगळवारी सकाळी नऊ वाजल्यापासून माहुली येथे आंदोलनाला सुरुवात झाली. जमीन मोजणीसाठी प्रशासनाने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. मात्र, नागेवाडी, माहुली आणि भाग्यनगर परिसरातील शेतकऱ्यांनी एकजूट दाखवत मोजणीला विरोध केला. प्रशासनाने वारंवार मोजणी सुरू करण्याचा प्रयत्न केला; मात्र आंदोलकांच्या विरोधामुळे तो यशस्वी झाला नाही.
दरम्यान, संतप्त शेतकऱ्यांनी मोजणी पथकाची यंत्रे ताब्यात घेऊन फोडल्याने परिसरात तणाव निर्माण झाला. संभाव्य आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आदल्या रात्रीपासूनच प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते. मात्र, आंदोलनाचा जोर वाढल्यानंतर त्यांची सायंकाळी सुटका करण्यात आली.
यावेळी राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांची सुपीक जमीन महामार्गासाठी देण्यास तीव्र विरोध दर्शविला. शक्तीपीठ महामार्गाची संयुक्त मोजणी कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नसल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. उद्यापासून जिल्ह्यात ज्या ठिकाणी मोजणीचा प्रयत्न होईल, त्या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांनी एकजुटीने विरोध करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
या आंदोलनामुळे शक्तीपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, आगामी काळात प्रशासन आणि शेतकरी यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
फोटोओळ : माहुली (ता. खानापूर) येथे शक्तीपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीविरोधात माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले. शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधामुळे प्रशासनाला मोजणी न करताच माघार घ्यावी लागली.




