तासगाव : सांगली जिल्ह्यातील कोणत्या हॉस्पिटलला किती बेड शिल्लक आहेत, याची माहिती नागरिकांना मिळण्यासाठी आर. आर. (आबा) पाटील युवा प्रतिष्ठान, तासगाव व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, तासगाव – कवठेमहांकाळ यांच्यावतीने कोव्हीड कमांड सेंटर सुरू करण्यात आले आहे. युवा नेते रोहित पाटील यांच्याहस्ते या सेंटरचे उदघाटन करण्यात आले. या सेंटरच्या माध्यमातून नागरिकांना जिल्ह्यातील बेडच्या उपलब्धतेबाबत माहिती मिळणार आहे. त्यासाठी नागरिकांनी 02346 – 240500 या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सांगली जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट उसळली आहे. दररोज हजारो रुग्णांना कोरोनाची बाधा होत आहे. यातील अनेकांवर ‘होम आयसोलेशन’मध्ये उपचार होतात. मात्र बऱ्याचजणांना हॉस्पिटलची गरज भासते. दरम्यान, रुग्णवाढीचा दर आणि उपलब्ध बेड यामध्ये जमीन – अस्मानाचा फरक आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना बेड मिळवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. बेड मिळवण्यासाठी संपर्क कुठे साधायचा, याचीही माहिती अनेकांना नसते. परिणामी अशांची फरफट होते.
ही फरफट थांबण्यासाठी व रुग्णांच्या नातेवाईकांना सहजरित्या बेडबाबत माहिती मिळावी, यासाठी राष्ट्रवादीच्यावतीने आमदार सुमन पाटील यांच्या मार्केट यार्डातील कार्यालयात कोव्हीड कमांड सेंटर सुरू करण्यात आले आहे. या सेंटरवर कॉल केल्यानंतर नागरिकांना अवघ्या काही मिनिटांत सांगली जिल्ह्यात कोणत्या हॉस्पिटलमध्ये बेड मिळेल, याची माहिती मिळणार आहे. या सेंटरचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन युवा नेते रोहित पाटील यांनी केले आहे.
कोव्हीड कमांड सेंटरमुळे रुग्णांच्या नातेवाईकांना आधार मिळेल : रोहित पाटील*
सांगली जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट वेगाने फैलावत आहे. दररोज हजारो रुग्ण सापडत आहेत. रुग्ण पॉझिटिव्ह आला की त्याचे घरचे व अन्य नातेवाईक भांबावून जातात. उपचारासाठी बेड शोधताना त्यांची दमछाक होते. अनेकांना बेडसाठी कुठे संपर्क साधायचा याचीच माहिती नसते. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना आधार देण्यासाठी आम्ही कोव्हीड कमांड सेंटर सुरू केले आहे. याचा रुग्णांच्या नातेवाईकांना लाभ होईलच शिवाय आधारही मिळेल, अशी आशा रोहित पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.