जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नासाठी जत तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या (शि.द.) शिष्टमंडळाने जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अरविंद धरणगुत्तीकर यांना निवेदन देत चर्चा केली. गटविकास अधिकारी यांनी शिष्टमंडळाशी चर्चा करून तात्काळ गटशिक्षणाधिकारी यांच्याशी चर्चा करून तालुक्यातील शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या.
तालुकाध्यक्ष भारत क्षीरसागर, जिल्हा उपाध्यक्ष जैनुद्दीन नदाफ,तालुका सरचिटणी गुंडा मुंजे, तालुका संघटक विष्णू ठाकरे यांनी जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अरविंद धरणगुत्तीकर यांची भेट घेतली.
तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या आयकर विषयक प्रश्न मार्गी लावावा, जिल्हा परिषद शाळांच्या न्यायप्रविष्ठ व वादग्रस्त जागेसंदर्भात न्यायालयीन कामकाज पहाणे कामी जिल्हा परिषदेच्यावतीने सरकारी वकिलांची नेमणूक करावी, प्राथमिक शाळांना लागणाऱ्या भौतिक सोयी- सुविधा ग्रामपंचायत निधीतून पूर्ण करव्यात,
पंचायत समितीकडून वितरण होऊनही उमदी आणि संख केंद्रातील प्राथमिक शिक्षकांचा पगार बँक व्यवस्थापनकडून उशिरा होत आहेत त्या इतर केंद्राप्रमाणे व्हाव्यात यासाठी त्यांना सूचना करण्यात यावे, धोकादायक शाळा दुरुस्त कराव्यात, जिल्हा परिषद शिक्षक बदली धोरण निश्चित करावे, तालुक्यातील शिक्षकांची वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणीनुसार प्रस्ताव पाठवावेत, शिक्षण सेवक,दिव्यांग शिक्षक ,महिला शिक्षक व पन्नास वर्ष वय असणाऱ्या शिक्षकांना कोविड-कामाचे आदेश देऊ नयेत यासह विविध मागण्या यावेळी शिष्टमंडळाच्या वतीने तालुकाध्यक्ष भारत क्षीरसागर यांनी केल्या.
शिक्षक संघांच्या या मागणीची दखल घेत बीडीओ धरणगुत्तीकर यांनी तात्काळ गटशिक्षणाधिकारी यांच्याशी चर्चा केली. शिक्षकांच्या आयकराचा प्रलंबित प्रश्नाबरोबरच विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी बीडीओ धरणगुत्तीकर यांनी गटशिक्षणाधिकारी आर डी शिंदे यांना तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने यावेळी बीडीओ धरणगुत्तिकर यांचे आभार मानले.
जत तालूका प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने बिडीओ अरविंद धरणगुत्तीकर व गटशिक्षणाधिकारी आर डी शिंदे यांना निवेदन देताना तालुकाध्यक्ष भारत क्षीरसागर आदी.