जतच्या यल्लमादेवी परिसरात 7 दिवस जमावबंदी | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी निंयत्रणासाठी प्रशासनाचा निर्णय
जत,प्रतिनिधी : महाराष्ट्र,कर्नाटकात प्रसिद्ध असलेली जतची श्री.यल्लमा देवीची यात्रा यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे. तरीही भाविकांची गर्दी होण्याची शक्यता असल्याने जत तालुका प्रशासनाकडून ता.8 जानेवारी 2021 ते 13 जानेवारी 2021 पर्यत मंदिर परिसरात जमावबंदी आदेश लागू करण्यात आल्याची माहिती तहसीलदार सचिन पाटील यांनी दिली आहे.
जत शहरातील बिंळूर रोडला असलेल्या श्री.यल्लमा देवी मंदिर परिसरात दरवर्षी मोठी यात्रा भरते.यात्रेला महाराष्ट्र, कर्नाटक राज्यातून दहा लाखावर भाविकांची उपस्थिती असते.यंदा 8 जानेवारी ते 13 जानेवारी पर्यत यात्रा भरणार होती.मात्र देशासह राज्यामध्ये कोरोना महामारीचा प्रादूर्भाव कायम आहे.तरीही यात्रा काळात भाविक मोठ्या संख्येने येण्याची शक्यता असल्याने तालुका प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
ता.8 ते ता.13 जानेवारी पर्यत मंदिर परिसरातील दोन किलोमीटर त्रिज्येच्या स्थलसीमा हद्दीत ता.7 जानेवारी मध्यरात्री 1 वाजलेपासून ता.14 जानेवारी मध्यरात्री 24 वाजेपर्यत भाविकांना प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच पाच किंवा त्यापेक्षा जास्त जणांना एकत्र फिरणास प्रतिबंध करण्यात आला आहे.फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे.

यात्रा काळात फक्त देवीचे मंदिरातील पुजा, विधी शासनाच्या नियमांचे पालन करुन करण्यात येणार आहेत.भाविकांनी सहकार्य करावे,असे आवाहन तहसीलदार सचिन पाटील यांनी केले आहे.
जतेत यंदा हे चित्र दिसणार नाही