खा.संजय पाटील गटातील दिग्गज सेनेत दाखल
तासगाव : तासगावात भाजपचे खासदार संजय पाटील गटाला ऐन ग्रामपंचायत निवडणुकीच्या धामधुमीत तडे जाऊ लागले आहेत. या गटातील प्रमुख कार्यकर्त्यांचा बुरुज ढासळू लागला आहे. माजी नगराध्यक्ष अविनाश पाटील, पश्चिम महाराष्ट्र सरपंच परिषदेचे विभागीय अध्यक्ष प्रदीप माने, पंचायत समितीचे माजी सभापती जयवंत माळी यांनी शनिवारी मुंबई येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी हातात शिवबंधन बांधून घेत खासदार गटाला कायमची सोडचिठ्ठी दिली.

यानंतर पक्ष सोडणाऱ्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या समर्थकांनी शहरात फटाक्यांची आतषबाजी केली.अविनाश पाटील, प्रदीप माने, जयवंत माळी हे खासदार संजय पाटील गटाचे प्रमुख शिलेदार होते. खासदारांच्या संपूर्ण राजकीय वाटचालीत ही मंडळी त्यांच्यासोबत सावलीप्रमाणे राहिली. खासदार पाटील यांचे नेतृत्व घडवण्यात व वाढवण्यात या सर्वांचा सिंहाचा वाटा होता.