जत,प्रतिनिधी : यंदाचा साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला असून,जत तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर ऊसतोड कामगार राज्याच्या कानाकोपऱ्यात उसाच्या फडात दाखल झालेे आहेत. आता तालुक्यातील 30 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका जानेवारीत होत आहेत.या निवडणूकीसाठी स्थलांतरित झालेल्या मतदार व ऊसतोड कामगारांना मतदानासाठी गावी परत आणण्याचे मोठे आव्हान गावच्या पुढाऱ्यांसमोर असल्याचे दिसून येत आहे.
देशभरात कोविड-19 प्रादुर्भाव वाढल्याने ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच ग्रामपंचायतीचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाने आता जाहीर केला आहे.जत तालुक्यातील 114 ग्रामपंचायतींपैकी 30 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत.तालुक्यात पुर्व भागासह अन्य भागात मोठ्या प्रमाणात ऊसतोड कामगार आहेत.
दरवर्षी राज्यातील, तसेच राज्याबाहेरील साखर कारखान्यांना हे मजूर गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी जत तालुक्यातून स्थलांतरित होतात. सप्टेंबर महिन्यात स्थलांतरित झालेले ऊसतोड कामगार संपूर्ण कुटुंबाला सोबत घेऊन जातात. कारखान्याच्या सहा ते सात महिन्यांच्या गळीत हंगामाच्या काळात हे कुटुंब गावाबाहेर असते. आता ग्रामपंचायतीच्या वाॅर्डात मतदारसंख्या अगोदरच कमी असल्याने आणि मतदार स्थलांतरित झालेले असल्याने गाव व पुढारी अडचणीत सापडले आहेत. तालुक्यातील पुर्व भागातील प्रत्येक ग्रा.पं.अंतर्गत स्थलांतरित ऊसतोड मजुरांचा अंदाज घेतला असता एका ग्रामपंचायतीमध्ये 400 पेक्षा अधिक मतदार स्थलांतरित झाले आहेत.
त्यामुळे 30 ग्रामपंचायतींमधील स्थलांतरित मजुरांचा आकडा मोठा राहणार असून, या मतदारांना परत आणण्याचे आव्हान पॅनल प्रमुखांसमोर उभे आहे.ग्रा.पं.मध्ये निवडणुकीची रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. त्यामुळे ग्रा.पं.च्या प्रभागामधील एका सदस्याचा 5 ते 10 मतांनी विजय होतो. अटीतटीच्या निवडणुका होत असल्याने स्थलांतरित झालेले मतदार मतदानासाठी आणणे मोठे खर्चिक असल्याचे दिसून येत आहे.