जत,प्रतिनिधी : स्वच्छ भारत मिशन अभियानांतर्गत संपूर्ण देशात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. घर तेथे शौचालय निर्मितीसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च शासनाच्यावतीने केला जात असताना जत तालुक्यातील ग्रामपंचायती अंतर्गत बांधकाम झालेल्या शौचालयाची दैनावस्था झाली आहे. निकृष्ट दर्जाचे काम झाल्याने वेळेपूर्वीच नामशेष होत असून, नागरिक त्याचा उपयोग अडगळीचे सामान ठेवण्यासाठी करीत असल्याचे संतापजनक चित्र आहे. जागतिक शौचालय दिनी ही बाब लक्षवेधी ठरावी.
देशभरातील खेड्यांपासून शहरापर्यंत स्वच्छता मोहीम राबविण्यासाठी सरपंच ते पंतप्रधानांपर्यंत सर्वांनीच रस्त्यावर उतरून जनजागृती केली. दुसरीकडे ग्रामीण भागात महिलांना उघड्यावर शौचालयासाठी जावे लागत असल्याचे गंभीर चित्र आहे. गावागावांत स्वच्छ भारत मिशन अभियान अंतर्गत शौचालय बांधकामाची मोहीम मोठ्या प्रमाणात राबविला जात आहे. कोट्यवधी रुपयांचा खर्च नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने होत असताना,जत तालुक्यांमध्ये मात्र ग्रामपंचायती अंतर्गत शौचालय बांधकामाचे तीनतेरा वाजले आहेत.
तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती अंतर्गत बांधकाम झालेले शौचालय एकतर अर्धवट किंवा वापराविना अडगळीत पडून असल्याचे चित्र आहे. त्यावरील लाखो रुपयांचा खर्च मात्र पूर्ण दाखविण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.संबंधित ग्रामसेवक पदाधिकारी बांधकामात संगनमताने मोठ्या प्रमाणात अपहार केल्याचा आरोप आहे. या संपूर्ण ग्रामपंचायती अंतर्गत झालेल्या विविध कामांची सखोल व मुद्देसूद चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.
स्वच्छ भारत अभियाना अतर्गंत अनेक गावात स्वच्छालये बांधण्यात आले आहेत.
यातील अपवाद वगळता एकाही स्वच्छालयाचा वापर होत नसल्याचे वास्तव चित्र जत तालुक्यात आहे.मोठ्या प्रमाणात स्वच्छालय कामात भष्ट्राचार झाला आहे.तालुका प्रशासनासह स्थानिक ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, ग्रामसेवकांनी निकृष्ठ कामे करून निधीवर डल्ला मारला आहे.स्वच्छालय बांधण्याचे साधे नियमही पायदळी तुडविले आहेत.कोणत्यातरी बोगस कंपनीकडून सिमेंटच्या थाळ्या वापरून स्वच्छालयाचे सापळे उभारण्यात आले आहेत.जत तालुक्यातील गावागावात हे चित्र आहे.त्यामुळे जागतिक स्वच्छालय दिन साजरा करताना तालुक्यातील वास्तव परिस्थिती पुढे कसे बदलणार चित्र असे म्हणायची वेळ आली आहे.