जत,प्रतिनिधी : भारतीय संस्कृतीतील एक मोठा सण असलेला दिवाळी हा सण देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. तब्बल पाच दिवस विविध परंपरेप्रमाणे नागरिक हा सण उत्साहात साजरा करतात. प्रामुख्याने दिव्यांचा सण असलेल्या दिवाळीत रोषणाई हा महत्त्वाचा भाग असून,यादरम्यान घरोघरी दिवे, पणत्या, आकाश कंदिल, लाइटच्या माळा लावल्या जातात.
रंगीबेरंगी रोषणाईने झगमगणारा परिसर पाहणे हा आनंद देणारा सोहळा असतो. यावेळी आपल्या नातेवाईकांच्या भेटी घेऊन त्यांच्या सोबत हा सण साजरा करण्याला अनेक जण प्राधान्य देतात. दिवाळीचा हा उत्साह शहरातही दिसून येत आहे. करोनामुळे तब्बल सात महिन्यानंतर दिवाळीचा उत्साह संचारला आहे.
बाजार पेठा फुलल्या आहेत.करोनामुळे तब्बल सात महिन्यांचा कठीण काळ अनुभवल्यानंतर यंदा दिवाळीत नेहमीचा उत्साह दिसेल का? असा प्रश्न उपस्थित होत असतानाच, करोनामुळे सर्वत्र अडचणीच्या पुढे जात नागरिकांत दिवाळीचा आंनद,उत्साह दिसत आहे.आपल्या कुटुंबीयांसाठी, नातेवाईकांसाठी कपडे,भेटवस्तू, त्यांच्या आवडीचे खाद्यपदार्थ यांची खरेदी करत आहेत. तर पूजा साहित्य, फराळाचे पदार्थ बनविण्यासाठी लागणाऱ्या वस्तू, रांगोळी,सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारात महिला वर्गाची मोठी झुंबड उडाली आहे. अगदी दिवाळीचा पहिला दिवस असलेल्या रमा एकादशी दिवशीदेखील नागरिकांची खरेदीसाठीची लगबग दिसून आली.