जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात कोरोनाने हाहाकार माजवला होता.एकवेळ मोठ्या संख्येने कोरोना पॉझिटिव्ह सापडत असल्याने भितीचे वातावरण पसरले होते. मात्र प्रशासनाचे कष्ट, नागरिकांची सतर्कता यामुळे आता तालुक्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे सुरू आहे. तालुका कोरोनामुक्तीकडे वाटचाल करीत असताना आरोग्य विभागाचे कष्ट सार्थकी लागत आहेत. दरम्यान, मंगळवारी तालुक्यात अवघे ,7 रुग्ण सापडले आहेत.
जत तालुक्यात कोरोनाने थैमान घातले होते. गावागावात कोरोनाच्या विषाणूने तांडव करायला सुरू केले होते. रुग्णसंख्या अतिशय वेगाने वाढत होती. रुग्णांना बेड उपलब्ध होत नव्हते. ऑक्सिजन, व्हेंटिलेटरअभावी रुग्ण दगावत होते. गावागावात भीतीचे वातावरण तयार झाले होते. रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासन रात्रीचा दिवस करीत होते. मात्र कोरोनाचा फैलाव रोखण्यात प्रशासन अपयशी होत होते. त्याचवेळी आमदार विक्रमसिंह सांवत यांच्या माध्यमातून जतेत कोरोना रुग्णालये सुरू झाली.
त्यामुळे रुग्णांची सोय जतमध्येच होऊ लागली.दरम्यान, प्रशासनाने खचून न जाता आपले प्रयत्न सोडले नाहीत. लोकांच्या प्रबोधनाबरोबरच संशयितांची तपासणी, विलगिकरण आणि उपचार या पातळ्यांवर प्रशासनाने नेटके नियोजन केले. नागरिकांनीही कोरोनाच्या व्याप्तीकडे गंभीरपणे पहायला सुरुवात केली.जत शहरासह ग्रामीण भागातील व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने लॉकडाऊन करीत आपली दुकाने काही काळ बंद ठेवली. त्याचाच परिपाक म्हणून सद्यस्थितीला तालुक्यात कोरोना आटोक्यात आल्याचे दिसून येत आहे.
तालुक्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू असताना नागरिकांची आणि प्रशासनाची जबाबदारी आणखीन वाढली आहे. युरोपियन देशात कोरोनाची दुसरी लाट अधिक तीव्रतेने येत आहे. तर भारतात आता अनेक गोष्टी अनलॉक होत आहेत. त्यातच दिवाळीचा सण तोंडावर आहे. लोक रस्त्यावर खरदेसाठी गर्दी करीत आहेत. अनेकजण नियमांचे उल्लंघन करीत आहेत. परिणामी कोरोनाला पुन्हा आमंत्रण मिळण्याची शक्यता आहे.
त्यामुळे नागरिकांनी बेफिकीर राहू नये. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. सॅनिटायझर, मास्क, सोशल डिस्टन्स या गोष्टींचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.दरम्यान, तालुका कोरोनामुक्तीकडे वाटचाल करीत असताना मंगळवारी तालुक्यात अवघे 7 रुग्ण सापडले. जत शहर 4,कंठी 2,वाळेखिंडी 1 येथे नवे रुग्ण आढळून आले आहेत.