खलनिग्रहनाय हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे. याचा अर्थ महाराष्ट्र पोलीस सज्जनांचे रक्षण करण्यास आणि दुर्जनांचा नायनाट करण्यास कटिबद्ध आहे. या ब्रिदाला जागून महाराष्ट्र पोलीस आपले कर्तव्य बजावत आहेत पण; अलीकडच्या काही घटनांवरून पोलिसांच्याच संरक्षणाचे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण अलीकडे पोलिसांवर हल्ले होण्याच्या घटना वाढल्या आहेत. मागील सहा महिन्यांत विशेषतः लॉक डाऊनच्या अंमलबजावणीसाठी पोलिसांनी केलेल्या प्रतिबंधात्मक उपाय योजनामुळे राज्यभरात वाद आणि हाणामारीचे प्रसंग उदभवले.
मार्च 2020 पासून पोलिसांवर हात उगारल्याच्या 380 घटना पोलीस दप्तरी नोंद झाल्या आहेत तर त्यात 90 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. मुंबईत जेवणाचे पार्सल पोहचवणाऱ्या बाईने पोलिसाला शिवीगाळ केली. मुंबईत सादविका तिवारी व मोहसीन खान यांनी एकनाथ पारठे या पोलीस कर्मचाऱ्याची कॉलर पकडून त्यास मारहान केली. या मारहाणीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. हे व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यावर सर्वसामान्य नागरिकांमधून संतापाचीच भावना व्यक्त होत आहे.
पूर्वी पोलिसांचा एक दरारा होता. खाकी वर्दीतील पोलीस गावात आला तरी संपूर्ण गाव चिडीचूप होत असत. गावातच नाही तर शहरातही पोलिसांचा दरारा होता. आता पोलिसांचा पूर्वीसारखा दरारा उरला नाही. पोलिसांबाबत जी भीती होती ती आता नाहीशी झाली आहे याला काही प्रमाणात पोलिसही जबाबदार आहे. मूठभर अप्रामाणिक पोलीस कर्मचारी चिरीमिरी घेऊन गुन्ह्यांवर पांघरूण घालतात त्यामुळे पोलिसांबद्दलची भीती कमी होऊ लागली आहे.
अर्थात सर्वच पोलीस कर्मचारी असे आहेत असेही नाही आजही अनेक पोलीस कर्मचारी प्रामाणिकपणे आपली सेवा बजावत आहे. याच प्रामाणिक पोलीस कर्मचाऱ्यांबद्दल सर्वसामान्यांना आदरच आहे म्हणूनच पोलिसांवरील हल्ले सर्वसामान्य नागरिक सहन करू शकत नाही. सर्वसामान्य नागरिक पोलिसांबद्दल आदर व्यक्त करीत असताना पोलिसांवर होणारे हे हल्ले चीड आणणारे आहे. पोलिसांचे हात कायद्याने बांधल्याने पोलीस संयम बाळगतात पण त्यामुळेच समाज कंटकांची मुजोरी वाढत चालली असून थेट पोलिसांवर हात उचलण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. काही पोलीस जरी चुकीचे वागत असतील तरी त्यांच्यावर हात उगारण्याचा अधिकार कोणालाही नाही. पोलिसांकडून चूक झाली असेल तर त्याची तक्रार वरिष्ठांकडे करता येते त्यासाठी कायदा हातात घेण्याची आवश्यकता नाही.
पोलिसांवरील हल्ले निषेधार्हच आहे. पोलिसांवर हल्ले करण्याची घटना जितकी निषेधार्ह आहे तितकीच ती सामाजिकदृष्ट्या घातक आहे. त्यामुळेच पोलिसांवर हात उचलणाऱ्यांना अद्दल घडवलीच पाहिजे. पोलिसांवर हल्ला करण्याचा घटना घडल्या की समाज माध्यमातून आणि प्रसार माध्यमातून त्याची चर्चा होती. काही प्रमाणात हल्लेखोरांवर कारवाईही होते पण या हल्लेखोरांच्या सुटकेसाठी राजकीय कार्यकर्ते, नेतेच प्रयत्न करतात.
काही वेळा हल्लेखोरांवर कारवाई होऊ नये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर दबाव आणला जातो त्यामुळे समाज कंटकांची मुजोरी आणखी वाढते त्याचाच परिणाम म्हणजे या पोलिसांवर हल्ल्याच्या वाढत्या घटना. हे हल्ले चिंतनीय आहे. पोलिसांवरील हल्ल्याच्या या घटना पाहता सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षा देणारे पोलिसच असुरक्षितच असल्याचे चित्र दिसते. हे चित्र पोलिसांच्या मानसिकतेवर परिणाम करणारे आहे.
श्याम ठाणेदार,दौंड जिल्हा पुणे
9922546295