उत्तर प्रदेशातील हाथरस येथे झालेल्या सामूहिक बलात्कार व हत्याकांडाच्या घटनेनंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली असताना काही राजकीय नेते मात्र या घटनेसंदर्भात असंवेदनशील वस्क्तव्ये करुन आपल्या अकलेचे जाहीर प्रदर्शन करीत आहेत. मुलींवर योग्य संस्कार होत नसल्याने मुलींवर सामूहिक बलात्कार होत आहे. अशा घटनांना सरकार व तलवारीने रोखणे अशक्य आहे अशी मुक्ताफळे उत्तर प्रदेशमधील भाजप आमदार सुरेंद्र सिंग यांनी उधळले आहे. पश्चिम बंगालमधील भाजपचे नवनिर्वाचित अनुपम शहा यांनीही अशीच स्वतःची अक्कल पाजळताना म्हटले आहे की जर मला कोरोना झाला तर मी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मिठी मारेल. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यावर आता देशभरातून टीका होऊ लागली आहे.
सुरेंद्र सिंग, अनुपम शहा यांचे यांची ही वक्तव्ये जितके चीड आणणारे आहे तितकीच ती निषेधार्ह आहे. सुरेंद्र सिंग व अनुपम शहा यांचे हे वक्तव्य समस्त महिला वर्गाचा अपमान करणारे आहे. जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधीच जर महिलांप्रति अशी भावना ठेवत असेल तर जनतेने कोणाकडे पहावे. पद मिळाले की काही माणसे शेफरतात; गर्वाने बाधीत होतात आणि भ्रमिष्ठासारखे बडबडायला लागतात. असे बोलले म्हणजे फुकटची प्रसिद्धी मिळते असाही समज अनेकांनी करुन घेतलेला आहे म्हणूनच निवडणुकीच्या तोंडावर असे बरळण्याची नेत्यांमध्ये स्पर्धा लागते.
तूर्तास बिहारमध्ये निवडणुकांची लगबग रणधुमाळी सुरु झाली असून पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी निवडणूका आहेत त्यामुळे अशी असंवेदनशील वक्तव्यांची साथ येण्याची आता शक्यता आहे. राजकीय नेत्यांकडून सार्वजनिक जीवनात वावरताना, बोलताना सभ्यतेची अपेक्षा असते पण आताच्या या अशा नेत्यांकडून ही अपेक्षा करणेच चूक आहे. या अशा असंवेदनशील लोकांना निवडून देऊन जनतेनेच मोठी चूक केली असे म्हणावे लागेल. हे असे लोक लोकशाहीच्या मंदिरात बसून लोकांचे प्रतिनिधित्व करतात ही आपल्या लोकशाहीची मोठी शोकांतिका आहे.
लोकशाही व्यवस्थेस कलंक लावण्याचेच काम हे लोकप्रतिनिधी करीत आहे. या लोकप्रतिनिधींना जनतेनेच त्यांची जागा दाखवून द्यायला हवी. या असंवेदनशील लोकप्रतिनिधींची ही अशी मुक्ताफळे ऐकल्यावर वाटते की संस्काराची खरी गरज ही मुलींना नसून या बेजबाबदार राजकीय नेत्यांनाच आहे.
श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५