अंतर्गत चक्रव्यूहात इम्रान खान

0भारताशी दोन हात करण्याच्या इशारा देणारे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे स्वतःच अंतर्गत चक्रव्यूहात फसले आहे. पूर्ण बहुमत पाठीशी नसताना लष्कराच्या पाठबळावर पाकिस्तानचे पंतप्रधानपद मिळवणारे इम्रान खान सध्या खूपच अडचणीत आले आहेत. पाकिस्तानवर स्वतःची निरंकुश सत्ता राहावी म्हणून विरोधी पक्षांना चाबूक लावण्याची त्यांची खेळी आता त्यांच्याच अंगलट आली आहे. काहीही करुन विरोधी पक्षातील नेत्यांना विविध गुन्ह्यांखाली तुरुंगात डांबण्याचा एक कलमी कार्यक्रम त्यांनी राबवला आहे. पाकिस्तान पीपल्स पार्टीचे नेते व माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे बंधू शहाबाज शरीफ यांना त्यांनी तुरुंगात डांबले.


बेनझीर भुट्टो यांचे पती असिफ अली झरदारी यांच्याही अटकेची त्यांनी तयारी केली आहे. या पार्श्वभूमीवर सर्व विरोधीपक्ष इम्रान यांच्या विरोधात एकवटले आहेत. जनतेतूनही इम्रान यांच्या या दडपशाहीला विरोध होऊ लागला. इम्रान यांच्या हुकूमशाही प्रवृत्तीविरुद्ध पाकिस्तानी जनता आता रस्त्यावर उतरू लागली आहे. त्यामुळे  इम्रान यांची डोकेदुखी वाढली आहे. इम्रान यांची डोकेदुखी आणखी वाढणार आहे कारण पाकिस्तानमध्ये सध्या शिया सुन्नी वाद खूपच उसळला आहे. 


हा वाद इतका वाढला आहे की भविष्यात पाकमध्ये यादवी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पाकिस्तानमध्ये शिया सुन्नी वाद पूर्वीपासूनच आहे. पाकिस्तानमध्ये शियांची लोकसंख्या २२ टक्के तर सुन्नींची लोकसंख्या ७८ टक्के आहे. अल्पसंख्याक शिया पंथीयांवर  बहुसंख्य सुन्नी पंथीय अन्याय करतो. त्यांच्यात नेहमीच छोट्यामोठ्या झटपटी होत असतात. पण आता त्याने रुद्र रूप धारण केले आहे. शिया पंथीय  काफिर असून त्यांना धर्मबहिष्कृत करा या मागणीसाठी  सुन्नी पंथीयांनी मोठी रॅली काढली होती. विशेष म्हणजे सुन्नी पंथीयांना सौदी अरेबिया उघड पाठबळ देत आहे. सौदी अरेबिया सुन्नी पंथीयांना आर्थिक मदत करते म्हणून शिया पंथीयांनी इराणकडे मदत मागितली आहे विशेष म्हणजे या दोन्ही पंथांना पाकिस्तानच्या सरकारवर विश्वास नाही. पाकिस्तानचे सरकार आपले रक्षण करण्यास समर्थ नाही असा समज दोन्ही पंथीयांचा झाला आहे म्हणूनच दोन्ही पंथीय लोक इम्रान खान यांच्यावर टीका करीत आहे.


Rate Card

या सर्व घडामोडीमध्ये सौदी अरेबिया व इराण पाकमध्ये ढवळाढवळ करीत असूनही इम्रान त्यांना रोखू शकत नाही. पाकिस्तानात  निरंकुश सत्ता मिळवण्याच्या नादात संपूर्ण पाकिस्तानच आपल्या विरोधात जात आहे हे इम्रान यांच्या लक्षात आले आहे पण आता उशीर झाला आहे. इम्रान खान आता चक्रव्यूहात चांगलेच अडकले आहेत. या चक्रव्यूहातुन बाहेर निघणे इम्रान खान  यांच्यासाठी अवघड आहे. या अनागोंदीचा फायदा घेऊन पाकिस्तानात  पुन्हा एखादा मुशर्रफ तयार होऊ शकतो. पाकिस्तानात पुन्हा लष्करी राजवट लागू झाल्यास आश्चर्य वाटायला नको. 

श्याम ठाणेदार 

दौंड जिल्हा पुणे 

९९२२५४६२९५

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.