कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावात छत्रपती शिवाजी राजांचा अश्वारुढ पुतळा रातोरात हटवला या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे.बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावात गावकऱ्यांनी ग्रामपंचायतीच्या परवानगीने शिवरायांचा अश्वारुढ पुतळा उभारला होता. मात्र कर्नाटक सरकारने पोलिसांवर दबाव आणून हा पुतळा हटवला. कर्नाटक सरकारच्या या कृत्याचा सर्वत्र निषेध होत आहे आणि ते स्वाभाविकच आहे छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्राचेच नव्हे तर अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत आहे.छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे सर्वोत्तम गुणांचा महामेरू.
महाराष्ट्र भूमीचे स्वप्न साकार करणारे युगपुरुष! असे युगपुरुष युगायुगातून एकदाच जन्म घेतात. सामान्य लोकांना बरोबर घेऊन स्वराज्य, स्वधर्म व स्वभाषेसाठी असामान्य कर्तबगारी करतात म्हणूनच ते थोरपणाला पोहचतात. शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी समाजाला आधार देण्यासाठी स्वराज्य स्थापनेचे शपथ घेतली होतो. कोणाचेही पाठबळ नसताना, कोणतीही साधन सामुग्री नसताना शून्यातून विश्व निर्माण करून हिंदवी स्वराज्य स्थापन केले होते आणि रयतेला सुखी केले. शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राची अस्मिता.
महाराष्ट्राच्या अस्मितेला जर कोणी हात घातला तर मराठी माणूस ते सहन करणार नाही. कर्नाटक सरकारचा महाराष्ट्रावरील राग हा आजचा नाही. काहीतरी वाद उकरुन महाराष्ट्राला डीवचत राहणे आणि त्यातून आपली राजकीय पोळी भाजणे हेच काम तेथील आजवरची सरकारे करीत आले आहेत. कर्नाटकातील एडीयुरप्पा सरकारही त्याला अपवाद नाही. पण यावेळी कर्नाटक सरकारने केलेली आगळीक माफ करण्यासारखी नाही.शिवाजी महाराजांसारख्या दैवतांचा जर कर्नाटक सरकार अपमान करीत असेल तर ते कोणताही मराठी माणूस सहन करणार नाही. आपण जे कृत्य करतोय त्यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळेल हे माहीत असूनही कर्नाटक सरकारने हे कृत्य केले आहे याबद्दल खरे तर पंतप्रधानांनीच एडीयुरप्पा यांचे कान उपटायला हवेत इतकेच नाही तर या अक्षम्य चुकीसाठी एडीयुरप्पा यांची मुख्यमंत्रीपदावरून हकालपट्टी करायला हवी.
श्याम बसप्पा ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
9922546295