जत,प्रतिनिधी: जतचे पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांची बदली रद्द करावी या मागणीसाठी भाजप,रासप, आरपीआय, वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने जत शहरातील विजापूर-गुहागर या महामार्गावर महाराणा प्रताप चौक येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
यावेळी काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.या आदोलनात भाजपचे तालुकाध्यक्ष सुनील पवार,अँड.प्रभाकर जाधव,रासपचे माजी जिल्हा अध्यक्ष अजितकुमार पाटील,आरपीआयचे जिल्हा अध्यक्ष संजय कांबळे, वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष अमोल साबळे, नगरसेवक विजय ताड,बंडू कांबळे,गौतम ऐवाळे,प्रवीण वाघमोडे हे उपस्थित होते.
यावेळी बोलताना भाजपचे तालुका अध्यक्ष सुनील पवार म्हणाले की,आमदार विक्रमसिंह सावंत यांनी भूलथापा देऊन निवडून आले आहेत. म्हैसाळच्या पाण्यासाठी एक रुपयाचाही निधी आ.सांवत यांनी आणला नाही. कर्नाटकचा मंत्र्यांना भेटून काही उपयोग होणार नाही. त्यांनी महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना भेटावे.खासदार संजयकाका पाटील व माजी आमदार विलासराव जगताप यांनी म्हैसाळ योजनेसाठी जो निधी आणलेला आहे. त्याचे उद्घाटन आमदार विक्रमसिंह सावंत करत आहेत. त्यांनी स्वतः निधी खेचून आणावा,मगच उद्घाटने करावीत.
अँड प्रभाकर जाधव म्हणाले की,पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांनी त्यांची बदली आमदार विक्रमसिंह सावंत व त्यांच्या समर्थकांच्या जाचाला कंटाळून करून घेतलेली आहे. असे त्यांनी पत्रात नमूद केलेले आहे.त्यामुळे जतचे नुकसान होणार आहे.शेळके सारखा खमक्या अधिकारी गेल्याने कायदा-सुव्यवस्था प्रश्न उपस्थित राहणार आहे.
युवा नेते संग्राम जगताप म्हणाले की,पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांनी पदभार स्वीकारल्यापासून कायदा सुव्यवस्था व्यवस्थित होती.त्यांनी गुंडांचा बंदोबस्त केला होता.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी चांगले काम केले होते.कॉग्रेसच्या बगलबच्याचे दोन नंबर धंदे मोठ्या प्रमाणात सुरू होते.शेळकेनी ते बंद केले होते.
पो.नि.शेळकेची बदली रद्द करावी या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.