तासगाव(अमोल पाटील):तासगाव आगाराच्या कार्यालयात बसून आक्षेपार्ह डायलॉग वापरून टिकटॉक व्हिडिओ बनवणे मीना पाटील या वाहतूक निरीक्षकांना महागात पडले आहे. संबंधित आक्षेपार्ह व्हिडिओ ‘व्हायरल’ होता, त्याची दखल घेऊन विभाग नियंत्रक अमृता ताम्हणकर यांनी मीना पाटील यांना निलंबित केले आहे. शिवाय त्यांची खातेनिहाय चौकशी सुरू आहे, अशी माहिती ताम्हणकर यांनी दिली.
याबाबत माहिती अशी, मीना पाटील या येथील आगारात वाहतूक निरीक्षक म्हणून काम करतात. एकीकडे कोरोनाच्या गडद संकटात तासगाव आगाराचे कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. मात्र दुसरीकडे मीना पाटील या अधिकाऱ्याने चक्क आगाराच्या कार्यालयात पंख्याच्या थंड हवेला बसून काही टिकटॉक व्हिडिओ बनवले. हे व्हिडिओ चांगलेच ‘व्हायरल’ झाले. मात्र चक्क कार्यालयात आणि तेही कामाच्या वेळेत ऑन ड्युटी असताना असे व्हिडिओ केल्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठली.
यातील काही व्हिडिओ, त्यातील हावभाव, हे व्हिडिओ बनवताना बॅकग्राऊंडला दिलेले आक्षेपार्ह डायलॉग यामुळे मीना पाटील वादाच्या भोवऱ्यात सापडल्या. त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई व्हावी, अशी मागणी जोर धरू लागली. वर्दी दाखवून आक्षेपार्ह डायलॉग वापरत केलेला व्हिडिओ असो किंव्हा हातात पेन घेऊन सिगरेट ओढत असल्याचा हावभाव करणारा व्हिडिओ असो… अशा व्हिडिओमुळे एसटी महामंडळाच्या अब्रूचे धिंडवडे निघाले.
बसस्थानकावर हजारो महिला, विद्यार्थिनी येत असतात. एखाद्या महिला अधिकाऱ्याने असे आक्षेपार्ह व्हिडिओ आणि तेही चक्क कार्यालयात बसून बनवणे नक्कीच शोभणीय नाही. महिला आणि विद्यार्थिनींसमोर अशा अधिकारी नेमका काय आदर्श ठेवणार, असे अनेक सवाल यानिमित्ताने उपस्थित झाले.
अगोदरच तासगाव आगार अधिकाऱ्यांच्या कारभारामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. आगारातील काही अधिकाऱ्यांच्याबाबत यापूर्वीदेखील विभाग नियंत्रकांकडे तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यात आता मीना पाटील यांच्या या नवीन करामतीची भर पडली आहे. असल्या करामतीमुळे आगाराच्या कारभारावर शिंतोडे उडवले जात आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांनी जबाबदारीने काम करताना आपण एका पदावर आहे, याचे भान ठेवणे गरजेचे आहे.
दरम्यान, मीना पाटील यांच्या या कारनाम्याची पोलखोल होताच,जिल्ह्यात खळबळ उडाली. विभाग नियंत्रक ताम्हणकर यांनीही गंभीर दखल घेत पाटील यांना निलंबित केले आहे. शिवाय त्यांची खातेनिहाय चौकशीही सुरू केली आहे.