दया,करूना,शांतीचा संदेश देणारे | निरकांरी मिशनचे बाबा हरदेवसिंहजी

0
2

संत निरंकारी मिशन द्वारे बाबा हरदेवसिंहजी यांना श्रद्धांजली अर्पण

देश-विदेशात कोविड-19 च्या संकटात मानवतेच्या सेवेत संलग्न राहत

बाबाजींच्या शिकवणूकीला क्रियात्मक रुप देण्याचे अनोखे उदाहरण भक्तगणांकडून प्रस्तुत 13 मे, 2020: जगभर पसरलेल्या निरंकारी परिवाराकडून संत निरंकारी मिशनचे तत्कालीन सद्गुरु, बाबा हरदेव सिंह जी महाराज यांना समर्पण दिवसाच्या रुपात 13 मे, 2020 रोजी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दरवर्षी 13 मे रोजी विशाल सत्संग आणि संत समागमाच्या रुपात ‘समर्पण दिवस’ साजरा केला जातो. तथापि, यावर्षी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून देण्यात आलेल्या निर्देशांनुसार समर्पण दिवसानिमित्त विशेष सत्संग समारोहांचे आयोजन न करता घरी बसूनच ऑनलाईन संत समागमाच्या माध्यमातून निरंकारी भक्त बाबा हरदेवसिंहजीच्या प्रति श्रद्धांजली अर्पण करत आहेत. या ऑनलाईन कार्यक्रमातूनच मिशनच्या वर्तमान प्रमुख, सद्गुरु माता सुदीक्षा जी महाराज यांचा पावन संदेश प्रसारित केला जात आहे.  

बाबा हरदेवसिंहजी यांनी मिशनचे आध्यात्मिक प्रमुख म्हणून 36 वर्षे मिशनची धुरा सांभाळली आणि चार वर्षांपूर्वी याच दिवशी (13 मे रोजी) आपल्या नश्वर देहाचा त्याग करुन निराकार रुपात विलीन झाले. 

आपल्या कार्यकाळात सद्गुरु बाबाजींनी अथक परिश्रम करुन आध्यात्मिक जागृतीद्वारे मिशनचा सत्य, प्रेम, मानवता आणि विश्वबंधुत्वाचा संदेश जगाच्या कानाकोपऱ्यात पोचवला ज्यायोगे वैर, द्वेष, ईर्षा, संकुचितपणा, भेदभाव यांसारख्या दुर्भावना दूर होऊन मानवी मूल्ये वाढीस लागावी आणि जगामध्ये प्रेम, दया करुणा व शांतीसुखाचे वातावरण स्थापित व्हावे. 

बाबा हरदेव सिंह जी यांनी त्यांच्या कालखंडात मिशनला 17 देशांपासून सुरु होऊन जगातील सर्व महाद्वीपांतील एकंदर 60 राष्ट्रांपर्यंत पोहचवले. या काळात राष्ट्रीय व आंतर्राष्ट्रीय स्तरावरील संत समागम, युवा सम्मेलने, विशाल सत्संग समारोह, समाज सेवा, विभिन्न धार्मिक व आध्यात्मिक संस्थांशी समन्वय इत्यादी बाबी अंतर्भूत होत्या. संयुक्त राष्ट्र संघाने संत निरंकारी मिशनला त्यांच्या सामाजिक व आर्थिक परिषदेवर सल्लागार म्हणून मान्यता दिलेली आहे ती बाबाजींच्या कालखंडातच.  

बाबाजींनी जगासमोर एक नवीन दृष्टिकोण ठेवला. त्यांच्या मते दोन राज्ये किंवा दोन देशांना विभाजित करणाऱ्या रेखा या खरे तर त्या राज्यांना व देशांना जोडणाऱ्या रेखा असतात तोडणाऱ्या नव्हे. अशी विचारसरणी अंगिकारली तर द्वेषाच्या भिंती पाडून प्रेमाचे पूल बांधणे शक्य होईल.  

मिशनचे मुख्य ध्येय आध्यात्मिक जागरुकतेच्या बाबतीत उत्तुंग प्रगती साधत असतानाच समाज कल्याणाच्या प्रति आपले दायित्व निभावण्यासाठीही बाबाजींनी ठोस पावले उचलली. समाज कल्याणाच्या उपक्रमांमध्ये बाबाजींनी मिशनला पुढे आणले. रक्तदान, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, शिक्षण, व्यवसाय मार्गदर्शन केंद्रे आदि क्षेत्रांमध्ये मिशनच्या लक्षणीय योगदानामागे बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या दिव्य मार्गदर्शनाचा फार मोठा हात आहे. जनसामान्यांना अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा माफक दरामध्ये उपलब्ध व्हाव्यात या दृष्टीकोनातून  बाबाजींनी ‘हेल्थ सिटी’ या मिशनच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा प्रारंभ केला आहे.  

बाबाजींनी मिशनच्या प्रथम रक्तपेढीचे लोकार्पण 26 जानेवारी, 2016 रोजी केले. ही रक्तपेढी मुंबईत विले पार्ले येथे आहे.

बाबाजींच्या मार्गदर्शनाखालीच त्यांच्या जन्मदिनानिमित्त 23 फेब्रुवारी रोजी मिशनमध्ये देशव्यापी स्वच्छता अभियान राबविण्यास सन 2003 पासून सुरवात झाली. या स्वच्छता अभियाना अंतर्गत पुरातन स्मारके, सरकारी इस्पितळे, रेल्वे स्थानके, समुद्र आणि नद्यांचे किनारे, उद्याने, पर्यटन स्थळे इत्यादि सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता केली जाते. काही अन्य संस्थांकडूनही अशाप्रकारे राबविलेल्या उपक्रमांमध्ये बाबाजींच्या प्रेरणेने मिशनने भाग घेतला.  

मिशनच्या सामाजिक कार्यांना विस्तृत रुप प्रदान करण्यासाठी बाबाजींनी एप्रिल, 2010 मध्ये संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनची निर्मिती केली. 

समालखा (हरियाणा) येथे ‘संत निरंकारी आध्यात्मिक स्थळ’ विकसीत करणे हे बाबाजींचे फार मोठे स्वप्न होते. ते साकार झाले असून आता मिशनचे वार्षिक संत समागम त्या विशाल स्थळावरच आयोजित केले जात आहेत. शिवाय अन्य लोकोपयोगी उपक्रमही तिथे राबविले जात आहेत. 

बाबा हरदेवसिंहजी यांनी मिशनमधील भारत तसेच विदेशातील युवावर्गाला सद्भावपूर्ण एकत्वाच्या भावनेने एकत्र येऊन मिशनच्या विविध उपक्रमांमध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहित केले आणि आध्यात्मिक शिकवणूकीद्वारे युवाशक्तीला समाजाच्या सकारात्मक उन्नतीकडे वळविले.  

वर्तमान काळात सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या दिव्य मार्गदर्शनाखाली बाबाजींची सत्य, प्रेम, एकत्व आणि विश्वबंधुत्वाची शिकवण जगभर पोचविण्याचे कार्य केले जात आहे. उल्लेखनीय आहे, की कोविड-19 चा मुकाबला करण्यासाठी सरकारच्या मार्गदर्शनानुसार सर्व प्रकारची सुरक्षात्मक काळजी घेत मानवतेची सेवा करण्याची प्रेरणा सद्गुरु माता सुदीक्षाजी भक्तगणांना देत आहेत.  

त्याचा परिणाम म्हणून कोविड-19 च्या संकटात हजारो गरजू कुटुंबांना राशन वाटले जात आहे, लाखों विस्थापित मजूरांना मोफत भोजन वितरीत केले जात आहे ज्यांचे पोट त्यांच्या दैनंदिन रोजगारावर अवलंबून होते. मिशनकडून कित्येक इस्पितळांना पीपीई किट्स दिल्या जात आहेत तर समाजाच्या वेगवेगळ्या घटकांना मास्क पुरविले जात आहेत. मिशनने आपली सत्संग भवनं क्वारंटाईन सेंटर बनविण्याची तयारी दर्शविली असून काही भवन क्वारंटाईन सेंटर बनलेली आहेत.   प्रशासनाच्या आवाहनानुसार रक्तदानही केले जात आहे. अशाप्रकारे बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या शिकवणूकीला क्रियात्मक रुप देण्याचे अनोखे उदाहरण निरंकारी भक्तांकडून समाजापुढे प्रस्तुत केले जात आहे.  

 

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here