जग अज्ञानाकडून विज्ञानाकडे वळणार आहे.-२ज्ञानाच्या या दिव्य प्रकाशात,विषमता जळणार आहे.-२विश्व शांतीसाठी जग अखेर,बुद्धाकडेच वळणार आहे.”-२ तथागत भगवान बुद्धांच्या तत्त्वज्ञानान संपूर्ण जगाला व्यापून टाकलं आहे.कुठल्याही चमत्काराला थारा नसलेला संपूर्ण विज्ञानावर आधारित असलेला बुध्द धम्म (धर्म नाही. धर्म म्हटल की कर्म कांड आल) जगामध्ये झपाट्याने वाढत आहे.सिद्धार्थ गौतमाचे बुध्द झालेत ते आपल्या मनाचे परिवर्तन करून त्याचा विकास करुन..बाबासाहेब आंबेडकर “बुध्द आणि त्यांचा धम्म” या ग्रंथात सांगतात की मन घडवित तसा मनुष्य होतो.आज आपण जे काही आहोत,आपलं व्यक्तीमत्व,आपल्या आवडी- निवडी,आपल्या सवयी,आपला स्वभाव या सर्व बाबी आपल्या मनानं घडविलेल्या आहेत.माणूस म्हणून आपला जन्म झाला म्हणून आपण माणूस बनतो अस नव्हे.माणसाला माणूस बनाव लागत,त्याला घडवाव लागत.हे आपोआप घडत नसत.त्याला जाणीवपूर्वक स्वतःवर कार्य करावे लागते.मनावर तसे योग्य चांगले संस्कार करावे लागतात तेव्हाच चांगला माणूस घडतो.यावरून एक लहानशी गोष्ट मला आठवली.लिओ नावाचे एक महान रशियन साहीत्यिक होऊन गेले.या महाशयांकडे लोक नियमित भेटायला येत असत.ते फार ज्ञानी आहेत आणि ते फार चांगलं मार्गदर्शन करतात अशी त्यांची ख्याती होती.जीवनाविषयी अनेक प्रश्न लोक त्यांना विचारीत असत.माञ एक गोष्ट ते सातत्याने सांगत असतं;ती म्हणजे माणसाला जर योग्य माणूस म्हणून घडायच असेल तर त्याच्यावर चांगले संस्कार होणं आवश्यक आहे!एक माणूस सातत्यानं यायचा त्याच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला की हे सतत चांगल्या संस्काराबद्ल बोलतात.मग हे संस्कार म्हणजे आहे तरी काय?त्यांनी यला प्रश्न विचारला -अहो तुम्ही सतत संस्कार फार महत्त्वाचे आहेत असं म्हणता,तर ते थोडे समाजावून सांगता काय? यांच्या जवळच एक लोखंडाचा साधा तुकडा पडला होता.तो त्यांनी उचलला व त्या माणसाला दाखवून विचारलं .”या लोखंडी तुकड्याची बाजारात काय कींमत येईल ?”माणूस म्हणाला,”या तुकड्याची काय किंमत येणार?फार तर दोन रूपये मिळतील.”
म्हणतो,”समजा या तुकड्याचं जर भांडं बनवलं तर? किती किंमत येईल?” माणूस,”निश्चितच थोडे अधिक पैसे मिळती.” ,म्हणतो “समजा या लोखंडी तुकड्यावर आणखी प्रक्रिया केली आणि त्याचं एखादं यंत्र बनवलं,तर? किती किंमत येईल?”माणूस म्हणाला,” महोदय जर याचं यंत्र बनवलं तर निश्चितच त्याची फार जास्त कींमत असेल.”म्हणतो.”समजल यालाच संस्कार म्हणतात.” तो माणूस माञ अजून गोंधळलेला दिसला. मग त्याला समजावून सांगू लागले प्रथम साधारण दिसणारं लोखंड त्याला काही विशेष महत्त्व कींवा किंमत नव्हती.परंतु जस जशी त्यावर प्रक्रिया होत गेली तस तशी त्याची किंमत वाढत गेली. म्हणाले,”अशाच प्रकारे माणसावर प्रक्रिया होणं,त्याच्या व्यक्तीमत्वाला आकार देणं गरजेचं असतं आणि ही जी काही प्रक्रिया असते यालाच संस्कार म्हणतात.बुध्द धम्माचं हेच कार्य आहे.माणूस घडविणं.त्याला सुसंस्कारीत करणं.आपण जीवन जगत असताना अनेक प्रकारच्या भौतिक सुखासाठी धडपडत असतो.आपल्याला आपल्या जीवनाची प्रगती करायची असते.प्रगतीचा माञ अतिशय संकुचित अर्थ आपणास अभिप्रेरीत असतो.आज प्रत्येक माणूस प्रगतीच्या मागे धावतो आहे.प्रगती म्हणजे अधिकाधिक भौतिक सुख प्राप्त करणं ही प्रगतीची व्याख्या झालेली आहे.माणसाच्या शारीरिक गरजांची उत्तमरित्या पुर्तता करणे हेच ध्येय ठरलेलेआहे. धर्मांतरानंतरच्या दुसऱ्या दिवशीच्या भाषणात डाॕ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात,”आपली आर्थिक भरभराट सुध्दा झाली पाहिजे आपण आर्थिक दृष्टया स्वतंत्र झालो पाहिजे.या ध्येयासाठी जीवनभर मी संघर्ष केला आहे.ऐवढंच नव्हे,माझी तीव्र इच्छा आहे की,मानव समाज आर्थिक दृष्टया सबळ व्हावा.परंतु या संदर्भात माझं काही स्वतंत्र मत आहे.मनुष्य आणि प्राणी यामध्ये अंतर आहे.प्राण्याला रोजचं अन्न मिळालं तरी त्याची गरज भागते,परंतु माणसाला माञ शरीराबरोबर मनाचा विकास करण्याची गरज असते.मन हे शुध्द विचारांनी भरलेलं असलं पाहिजे.म्हणून तुकाराम महाराज म्हणतात मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण.व्यक्तीगतरित्या मला असे वाटते की,ज्या राष्ट्रात केवळ खा-प्या आणि मजा करा अशा प्रकारचं लोकांच ध्येय असतं अशा राष्ट्राचा आपणास काहीही लाभ होणार नाही. रोगमुक्त राहण्यासाठी आपलं शरीर निरोगी असलं पाहिजे,तसेच आपलं शरीर स्वस्थ राखण्यासाठी आपलं मन ग्रहणशील बनविलं पाहिजे.नाहीतर माणसाचा विकास होतो आहे,त्याची प्रगती होत आहे असं म्हणता येणार नाही.”माणसाची प्रगती कींवा विकास म्हणजे केवळ भौतिक गरजांची पूर्तता नव्हे कींवा खा प्या आणि मजा करा असं माननं नव्हे.तर माणूस म्हणून आपल्या मनाचा विकास करणं हे प्रत्येक माणसाचं परमकर्तव्य होय. अन्यथा आपलं जीवन प्राण्यासारखे होऊन बसेल.याच भाषणात बाबासाहेब पुढे म्हणतात,”आम्ही या आंदोलनाची सुरुवात आपल्या मनाला विकसित आणि प्रशिक्षित करण्यासाठी केलेली आहे.आपण जी काही सुख दुःख भोगतो ती आपल्या कृतीचे परिणाम होत.आपल्या प्रत्येक कृतीला परिणाम आहेत.जर आपलं मन अशुद्ध असेल तर अशुद्ध मनानं केलेलं कायिक कींवा वाचिक कृत्य आपणासाठी दुःख निर्माण करील.जर आपलं मन शुध्द असेल,तर शुध्द मनानं केलेलं कायिक कींवा वाचिक कृत्य आपणासाठी सुख निर्माण करील.”मनाची मलिनता दूर करणं म्हणजे धम्म होय”.असे बाबासाहेब’ बुध्द आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथात सांगतात कारण मलिन किंवा अकुशल मनामुळेच आपण आपल्या जीवनाचे वाटोळे करतो पर्यायाने दुःख भोगतो.लोभ,द्वेष,मोह या तीन मुलभूत अकुशल मानसिक अवस्था आहेत.जर आपण जीवनाकडे पाहिले तर आपल्या लक्ष्यात येईल की या अकुशलांमुळे आपण दुःखी जीवन जगतो आहोत.मनाला यापासून मुक्त करणे म्हणजे मनाची शुध्दता होय.या नकारात्मक मानसिक अवस्थांचा त्याग करुन विधायक अवस्था दान,मैत्री,प्रज्ञेचा(सत्य ज्ञान) विकास करणे होय.आतापर्यंत आपण वरील जे काही विचार पाहिलेत त्यावरून आपली निश्चित खाञी झाली असेल की, आपण चांगलं काम केलं तर त्याचे परिणाम चांगले होणार आणि आपण वाईट काम केलं तर त्याचे परिणाम वाईट होणार .वाईट काम केलं तर ज्या प्रमाणे बैलाच्या खुराच्या मागे गाडीचं चाक येतं तसे दुःख हे येतेच. त्याला कोणीही रोखु शकत नाही.आपण जर चांगलं काम केलं तर ज्याप्रमाणे सावली आपली साथ सोडत नाही त्याप्रमाणे सुख आपली साथ सोडणार नाही.हाच बुद्धाच्या शिकवणुकीच्या गाभा आहे. बुद्धाच्या शिकवणुकीत मनाचा विकास करणं,त्यावर चांगले संस्कार करणे फारच महत्त्वाचे आहे.कोणतेही चांगले कींवा वाईट काम करायचे असल्यास प्रथम त्याचा उगम मनात होतो.म्हणून मनावर चांगले संस्कार करणं फारच गरजेचं आहे.जेव्हा आपणाला एखादं वाईट कृत्य करायच असतं तेव्हा मन हे प्रचंड राग,द्वेष,मत्सर यांनी भरावं लागत,त्यानंतर हा राग वाणी द्वारे प्रकट होतो.त्यानंतर त्याच रूपांतर(शरीराद्वारा) हाणामारीत होतं.आणि ज्या ठीकाणी भांडण होत त्याठिकाणचा आजूबाजूचा परिसरही तप्त होतो.म्हणून बुध्द म्हणतात “युद्धाने तर युद्ध वाढते नकोच संघर्ष शांती मधूनी क्रांती जन्मते होतो उत्कर्ष”.म्हणून म्हणावेसे वाटते,” मानवतेचे हे नाते नवे माणवास कळणार आहे.-२ जग अज्ञानाकडून विज्ञानाकडे वळत आहे.-२ ज्ञानाच्या या दिव्य प्रकाशात विषमता जळणार आहे.-२ विश्व शांतीसाठी जग अखेर बुद्धाकडेच वळणार आहे.-२”बुद्धाच तत्वज्ञान ज्या ज्या देशानी स्विकारलं ते ते देश प्रगतीच्या शिखरावर पोहचले.बुद्धाच्या तत्वज्ञानामुळेच जपान हा देश बेचिराख झाला असताना सुध्दा फिनिक्स पक्ष्याप्रमाणे त्यांनी झेप घेतली.भारतात बाबासाहेबानी बुध्दाला स्विकारलं आणि हरवलेला बुध्द त्यांनी भारताला पुन्हा मिळवून दिला.पण बाबासाहेबाबरोबर ज्यानी बुद्धाला स्विकारल त्यांची प्रचंड जबाबदारी होती की आपल्या वर्तणुकीतून,आपल्या चालण्यातुन,आपल्या बोलण्यातून अस सिद्ध करण गरजेच होत की या देशातील इतर जातीना अस वाटणं गरजेच होत की उद्याच जाऊन बुध्द धम्माची दिक्षा घ्यावी.का?तर त्याच उत्तर असायला हव होत की बाबा रे यांनी बूध्द स्विकारलाय. २५०० वर्षापूर्वी बुद्धानी सांगितलं होत आम्ही लोक दारू पिणार नाही,हिंसा करणार नाही,चोरी करणार नाही ,खोट बोलणार नाही व्यभिचार करणार नाही त्या बुद्धाच नाव घेऊन या देशातील बुध्द म्हणून घेणारी तरूणाई घस्यात दारू डोसते,आणि धिंगाना करते त्यामुळे ज्यांच्यावर प्रचंड जबाबदारी होती त्यांनाच बुध्द कळाला नाही.तरीही ज्यांना ज्यांना बुध्द कळालाय त्यांची जबाबदारी हजारो पटीन वाढलेली आहे.जगातील युद्धमय परिस्थिती पाहता आज भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला बुध्दा शिवाय पर्याय नाही.म्हणून बुध्द आणि त्यांचं तत्वज्ञान समजून घेण नितांत आवश्यक झालेल आहे.बुद्धानी मनाच्या संस्काराला कीती महत्त्व दिलेल आहे हे समजून घ्याव लागेल.बाबासाहेब आंबेडकर “बुध्द आणि त्यांचा धम्म”या ग्रंथात पहील्या भागातील सातव्या प्रकरणात बुद्धानी काय स्विकारलं या मथळ्याखाली लिहीतात,”माणसाने ज्या बाबीकडे लक्ष देणं आवश्यक आहे अशी पहीली बाब म्हणजे मनाचे संस्कार.
आता आपणापुढे एक प्रश्न निर्माण झाला असेल?की मग आपण आपल्या मनावर चांगले संस्कार कसे करायचे?त्याचा विकास कसा करायचा?त्याला अकुशलापासून मुक्त कसं करायचं?आपल्या मनावर कार्य करण्यासाठी तीन मुलभूत पध्दती आहेत.१)ध्यान २)निसर्ग आणि कला ३)मानवी संपर्क
या तीन माध्यमातून आपण स्वतःवर स्वतःच्या मनावर कार्य करू शकतो.ध्यान ही आपल्या मनावर कार्य करण्याची प्रत्यक्ष पध्दती होय.ध्यानामुळे आपल्या मनावर प्रत्यक्षपणे आपण कार्य करीत असतो.अनेकांना अनुभवांनी हे समजलेलं आहे की आपणात बदल होत असतो.आपलं मन अधिक शुध्द एकाग्र होतं.आपल्या मनातील अज्ञानाचे जळमट काढून टाकण्यास मदत होते.आपलं मन अधिक तरल संवेदनशील बनतं.निसर्ग आणि कलेच्या माध्यमातून सुध्दा आपण आपल्या मनावर कार्य करू शकतो.जेव्हा केव्हा आपण निसर्गाच्या संपर्कात,सानिध्यात येतो तेव्हा आपलं मन कसे असतं? जेव्हा आपण उत्तुंग शिखरे पाहतो,विशाल सागराकडे पाहतो.अमर्याद आकाशाकडे पाहतो.तेव्हा निश्चितच आपण भारावून जातो.या विशाल जगात आपण किती छोटे आहोत याची आपणास जाणीव होते,आपला अहंकार कमी होतो.सगळीकडे पाना फुलांनी बहरलेली वनश्री पाहीली की मन शांत होतं.मनातील अस्वस्थता कमी होते.आपलं मन चिंतनशील बनतं.निसर्ग सौंदर्य आपल्या मनावर कार्य करतं.म्हणून आपण वेळोवेळी निसर्गाच्या संपर्कात गेलो पाहिजे.निश्चितपणे याचा आपल्या मनावर परिणाम होतो.कलेबद्ल सुध्दा आपणास हेच म्हणता येईल इथे आपण ज्या कलेचा विचार करीत आहोत त्या उच्च प्रकारच्या आणि विशुद्ध कला होत उदा.उच्च प्रकारचं संगीत,नृत्य,साहीत्य,काव्य इत्यादी या माध्यमातून सुध्दा आपल्या मनावर कार्य होत असते.चांगल्या प्रकारचं साहीत्य,चांगल्या प्रकारचं काव्य आपल्या जीवनाला दिशा देत असते.त्यातूनच आपल्या मनाचा विकास होत असतो.आपण अशा प्रकारच्या उच्च आणि विशुद्ध संगीत,काव्य,साहीत्य याचा आस्वाद घ्यायला शिकलो पाहिजे.मनावर कार्य करणारी तिसरी बाब आहे मानवी संपर्क. अर्थातच ही बाब अतिशय महत्त्वाची आहे.कुणा एका तत्ववेत्यानं म्हटलं आहे की तुमचे कोण मिञआहेत,तुम्ही कुणाच्या संपर्कात राहता हे मला सांगा. म्हणजे तुम्ही कोण हे मला समजेल. अगदी खरं आहे.माणूस घडतो ते संगतीमुळेच खरंच संपर्काचा आपल्या मनावर खूप मोठा परिणाम होत असतो.आपण ज्या लोकांच्या संपर्कात राहतो,ज्यांच्या सभोवताल असतो त्याचा आपल्या मनावर परिणाम होतो.जर आपणाला योग्य प्रकारे घडायचे असेल आपल्या मनावर चांगले संस्कार करायचे असतील तर आपण योग्य माणसाच्या संपर्कात असलो पाहिजे.त्यांच्याशी मिञता साधली पाहीजे.यालाच बुध्द धम्मात कल्याणमिञता असे म्हणतात.बुध्द एकदा आनंदास सांगतो की,”कल्याणमिञता हेच संपूर्ण धम्म जीवन आहे.तेव्हा आपण खाञी केली पाहिजे की योग्य आचरणशील अनुभवी अशा मिञांचा सहवास आपणांस लाभेल.केवळ आचरणशील अनुभवी मिञांच्या संपर्कातून सुध्दा आपला विकास होत असतो.बुध्द म्हणतात प्रत्येक माणूस हा श्रेष्ठ माणूस होऊ शकतो,सुखी होऊ शकतो.परंतु त्यासाठी स्वतःवर स्वतःच्या मनवर कार्य करण्याची गरज आहे.नव्हे तसा जाणीवपूर्वक प्रयत्न झाला पाहिजे. असे झाले तरच आपल्या मनाचा विकास होऊन आपण सुध्दा बुध्द बनु शकतो.चांगला माणूस घडवण्यासाठी गौतम बुद्धाने मनाच्या संस्काराला खूप महत्व दिले आहे. तथागत बुद्ध म्हणतात “संस्कार हे गर्भापासूनच सुरू होतात. लहान मुलांवर संस्कार गर्भापासून ते तीन वर्षांपर्यंत व नंतर ते सात वर्षापर्यंत होतात. त्यानंतर होणारे संस्कार हे अत्यल्प असतात. म्हणून ज्यावेळी बालक गर्भात असताना गर्भधारणा झाल्यावर आज जे डॉक्टर सांगतात ओझे उचलू नका, उंच पायऱ्या चढू नका. हे सर्व तथागतांनी अडीच हजार वर्षांपूर्वीच सांगितलं आहे. तथागत म्हणतात “गर्भधारणा झाल्यावर अतिउष्ण,अतिथंड खाऊ नका. उंच पर्वतावर चढू नका. त्यानंतर त्यांनी पुढे सांगितलं आहे की बालक गर्भात असल्यावर घरातील वातावरण प्रसन्न आणि आनंदी ठेवा. घरात कधीही भांडण करू नका. जर तुम्हाला वाटत असेल आपल्या बालकाने खोटे बोलू नये तर बालक गर्भात असताना तुम्ही कधीही खोटे बोलू नका. तुम्हाला वाटत असेल आपल्या बालकाने चोरी करू नये तर तुम्ही चोरी करू नका. बायका म्हणतील आम्ही कुठे डाके घालायला चाललो, पण तुम्ही तुमच्या पतीला न विचारता खिशातील पैसे काढून घेत असाल तर ती सुद्धा चोरी आहे. तुम्हाला वाटत असेल तुमच्या बालकाने हिंसा करू नये तर तुम्ही कधीही हिंसा करू नका तुम्हाला वाटत असेल तुमच्या बालकाला कोणतेही व्यसन नको तर तुम्ही नशापाणी करू नका तंबाखू खाऊ नका. त्यामुळे सात वर्षांपर्यंत आपल्या बालकांवर चांगले संस्कार टाका. सात वर्षानंतर तुम्ही त्याला काही सांगायला गेलात तर बहुतेक मुलं ऐकत नाहीत. म्हणून सात वर्षानंतर तुम्ही बालकाचे मित्र बनून रहा. लहानपणापासून बालकामध्ये दान पारिमिता विकसित करा. आपण पाहतो एखाद्या लहान मुलानं दुसऱ्याला काही दिलं तर त्याची आई त्या मुलाला घरात नेऊन कूचकु कुचकु मारते आणि म्हणते मेल्या तो काही देतो का तुला? त्यानंतर मुलगा कोणालाही काही देत नाही त्याची देण्याची वृत्ती नष्ट होते. त्याला माहित होतं की आपण कोणाला काही दिल की मारतात. नंतर मोठा झाल्यावर तो आपल्या आई-वडिलांना सुद्धा काही देत नाही. त्यांना घराबाहेर धक्के मारून काढून देतो. खरं तर एखाद्या बालक कुणाला काही देत असेल तर त्याची पाठ थोपटावी. त्याला शाबासकी द्यावी. त्याची पापे घ्यावेत. पण आपण हे करत नाही मग मोठा झाल्यावर तो कुणालाही काही देत नाही हा तुमच्याच संस्काराचा परिणाम आहे. म्हणून गर्भधारणा झाल्यावर आनंदी आणि प्रसन्न रहा. या देशाचा चांगला माणूस म्हणून आपल्या बालकाला जन्माला घाला. एक बलवान राष्ट्र होण्यासाठी,एका बलवान सुसंस्कारित बालकाला जन्माला घाला.
लेखक – शंकर नामदेव गच्चे
(एम.ए.बी.एड्) नांदेड
-८२७५३९०४१०