जत,प्रतिनिधी ; स्टेट इनोव्हेशन अँड रिसर्च फाउंडेशन (सर फाउंडेशन) महाराष्ट्र राज्याच्या सांगली जिल्हा समन्वयकपदी जत पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या उमराणी जिल्हा परिषद शाळेचे उपक्रमशील विषय शिक्षक धरेप्पा उर्फ बाळू कट्टीमनी यांची नुकतीच निवड करण्यात आली.त्याबद्दल त्यांचे जत तालुक्यातुन विशेष अभिनंदन होत आहे.सोलापूर येथे मुख्य कार्यालय असलेले सर फाउंडेशन हे देशातील उपक्रमशील शिक्षकांचे एक अग्रगण्य नेटवर्क आहे. सर फाउंडेशन सन 2006 पासून देशातील नवोपक्रमशील शिक्षकांसाठी सतत नावीन्यपूर्ण प्रयोग राबवून प्रेरणादायी व्यासपीठ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असते. शिक्षकांच्या गुणवत्ता वाढीसाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून शिक्षकांचा गौरवक रण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील’टीचर इनोव्हेशन अवार्ड’ देऊन देशातील शिक्षकांचा सन्मानक रण्याचे महान कार्य सर फाउंडेशन करीत आहे. हे देशातील प्रयोगशील शिक्षकांचे एक हक्काचे व्यासपीठ असून माननीय बाळासाहेब वाघ, हेमा शिंदे, सिद्धाराम माशाळे हे राज्य समन्वयक आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून सर फाऊंडेशनच्या जिल्हा समन्वयकांच्या निवडी करण्यात आल्या असून बाळू कट्टीमनी यांनी आतापर्यंत राबविलेले विविध उपक्रम, नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून प्रभावी अध्यापन आणि विविध नवोपक्रम स्पर्धेत तालुका आणि जिल्हा स्तरावर मिळविलेले क्रमांक,तसेच विविध विषयांवर तालुका आणि केंद्रस्तरावर शिक्षकांच्या घेतलेल्या कार्यशाळा यांचा एकत्रित विचार करून सदरची निवड केली आहे.याशिवाय शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात केलेल्या सातत्यपूर्ण भरीव कार्याची दखल घेत सर फाउंडेशनने सांगली जिल्हा समन्वयक पदी त्यांची सार्थ निवड करण्यात आली आहे.तसेच कट्टीमनी हे शिक्षक समिती जिल्हयाच्या कार्यकारिणीमध्ये सक्रिय पदाधिकारी असून या माध्यमातून त्यांनी शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी सतत प्रशासनाकडे पाठपुरावा करून सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या या निवडीबद्दल जिल्ह्यातील अधिकारी व पदाधिकारी तसेच सर्व शिक्षक यांच्याकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.